शिवसेना हा महाराष्ट्रापुरताच प्रादेशिक पक्ष उरला आहे. पण, एकेकाळी शिवसेनेनं महाराष्ट्रासह संपूर्ण देशात विस्तार करण्याचा प्रयत्न केला होता. पण, एका फोननंतर शिवसेनेनं पाऊल मागे घेतलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्या फोनचा उल्लेख केला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांना तो फोन केला होता.
संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्या विस्ताराबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पक्षाचा विस्तार करण्याची उद्धव ठाकरेंची इच्छा होती. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या बाहेर पाऊल टाकलं असतं तर आम्हाला मोठा फायदा झाला, असता असं त्यांनी स्पष्ट केलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वाजपेयींनी काय सांगितलं?
राऊत यांनी सांगितलं की, 'आमची भाजपासोबत युती होती. अयोध्येतील आंदोलनानंतर हिंदी भाषिक राज्यांमध्ये बाळासाहेबांची क्रेझ होती. आम्ही 1992 नंतर निवडणूक लढवणार होतो. आम्हाला चांगला पाठिंबा मिळत होता. बाळासाहेब ठाकरे हिंदूंचे नेते होते. ते एक सुपरस्टार बनले होते. त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यावेळी अटलजींनी बाळासाहेबांमा फोन केला. तुम्ही निवडणूक लढवली तर आपल्या मतांचं विभाजन होईल आणि आमचं नुकसान होईल, असं त्यांनी सांगितलं.'
( नक्की वाचा : पंडित अण्णा आणि धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते, शरद पवारांनी परळीत सांगितला 'तो' किस्सा )
बाळासाहेबांनी घेतला निर्णय
अटलजींच्या फोननंतर बाहेरच्या राज्यात निवडणूक न लढण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला, असं राऊत यांनी सांगितलं. ते म्हणाले, 'बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं की, अटलजींचा फोन आला होता. त्यांचा आदर केला पाहिजे. त्यामुळे आपण निवडणूक लढणार नाही. आम्ही निवडणूक लढवली असतील तर त्यावेळी आमचे महाराष्ट्राच्या बाहेर 10-15 खासदार निवडून आले असते.'
अन्य राज्यात शिवसेना का वाढली नाही?
उत्तर प्रदेश तसंच मध्य प्रदेशात बाळासाहेबांची लाट होती. त्यावेळी अन्य राज्यात पक्षाला एक चेहरा हवा होता. एक नेतृत्त्व हवं होतं. ते आम्ही शोधू शकलो नाही. त्यामुळे आमचं नुकसान झालं, असं राऊत म्हणाले.
( नक्की वाचा : विधानसभा निवडणुकीत RSS च्या 'स्पेशल 65' ची एन्ट्री, काय आहे 'सजग रहो' अभियान? )
अन्य राज्यांमध्ये आम्हाला सक्षम नेतृत्व मिळालेलं नाही. आम्ही प्रयत्न केले. उद्धव ठाकरे वारंवार अयोध्येला गेले. आम्ही तिथं काही प्रयत्न केले. आमच्याकडं तिथं कार्यकर्ते आहेत, पण नेते नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.