राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (शनिवार, 9 नोव्हेंबर) रोजी परळीत सभा झाली. परळीमध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे उमेदवार आहेत. मागील निवडणुकीत शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली लढणारे मुंडे यंदा अजित पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमध्ये धनंजय मुंडे यांची भूमिका निर्णायक असल्याचं पवारांनी परळीतच स्पष्ट केलं. त्यामुळे साहजिकच ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. पवारांनी यावेळी बोलताना धनंजय मुंडे आणि त्यांचे वडिल पंडित अण्णा मुंडे यांचा एक किस्सा देखील परळीकरांना सांगितला.
गुंडगिरी संपवा
'अलिकडच्या काळात परळीला काय झालंय हे मला कळत नाही. परळीत गुंडगिरी वाढली. मला इथल्या व्यापाऱ्यांचे, दुकानदाराचे पत्र येतात, त्यांना धंदा करणेही अवघड आहे. त्या धंद्याचं लायसन त्यांनी त्यांच्या हातात ठेवली आहे. गुंडगिरीमुळे कष्टकरी समाज अडचणीत आला. हे चित्र बदलण्याची भूमिका घेणं आवश्यक आहे,' असं त्यांनी सांगितलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंडितअण्णा आणि धनंजय मुंडे घरी आले...
शरद पवार यांनी या भाषणामध्ये एक जुना किस्सा देखील सांगितला. 'मला कबुल केलं पाहिजे काही लोकांना त्यांच्या राजकीय संकटाच्या काळात मदतीची अपेक्षा होती. त्याकाळी माझ्याकडून मदत केली. मुंबईला माझ्या घरी पंडित अण्णा आणि धनंजय मुंडे आले. पंडित अण्णांनी सांगितलं आमच्या काही अडचणी आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी तुमची मदत हवी.
त्यांनी मला त्यांच्या मुलावर लक्ष ठेवायला सांगितलं. मी त्यांना संधी दिली. पक्षात घेतलं. संघटनेत जबाबदारी दिली. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपद दिलं. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात मंत्री केलं. जे शक्य होईल ते केलं. बीड जिल्ह्यात लोकांची सेवा करणारा तरुण पिढीच्या नेत्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं,दुर्दैवानं परिस्थिती बदलली. सत्ता आल्यानंतर पाय जमीनीवर ठेवावे लागतात. ज्यांना सत्ता दिली त्यांच्या डोक्यात सत्ता लवकर गेली,' असं पवारांनी यावेळी सांगितलं.
( नक्की वाचा : 'तुमच्या राष्ट्रीय नेत्याचं लग्न झालं नाही आणि हे...', धनंजय मुंडेंचा विरोधकांना टोला )
राष्ट्रवादी फोडणारी 3 लोकं
काही लोकांनी पक्ष फोडण्याचं काम केलं. त्यामध्ये तीन लोकं प्रामुख्यानं होते. राष्ट्रवादीमध्ये अंतर वाढवणारे, सहकाऱ्यांमध्ये गैरविश्वास निर्माण करणारे त्या दोन-तीन लोकांमध्ये कोण आहेत हे मी सांगण्याची गरज नाही. ज्यांनी पक्ष फोडला, त्यांना उद्याच्या निवडणुकीत पराभूत करा, असं आवाहन त्यांनी केलं.