महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगत आलाय. सर्वच राजकीय पक्ष मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. या निवडणुकीत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) एन्ट्री झाली आहे. RSS कडून त्यांच्या 65 पेक्षा जास्त संलग्न संघटनेच्या माध्यमातून 'सजग रहो' अभियान चालवलं जात आहे. RSS च्या या टीमला 'स्पेशल 65' असं म्हंटलं जात आहे.
RSS च्या या अभियानाचा उद्देश फक्त विधानसभा निवडणुकीत भाजपाला भक्कम करणे हा नाही. तर हिंदूंमध्ये फुट पाडणाऱ्या शक्तींना उत्तर देणे आहे. या प्रचाराचा परिणाम निवडणुकीत नक्की दिसेल. त्याचा फायदा महायुतीला होईल, असं आरएसएसचं मत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महायुतीला मिळणार हिंदू व्होट बँकेचा फायदा
राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार RSS च्या या अभियानाचा परिणाम राज्यातील विधानसभा निवडणुकीवर होईल. या अभियानाच्या माध्यमातून हिंदू व्होट बँक एकत्र करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याचा फायदा महायुतीला होईल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून चालवलं जात असलेलं 'सजग रहो' अभियान लोकसभा निवडणुकीनंतर देशात सुरु असलेल्या तीन राष्ट्रीय अभियानाचा भाग आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या हल्ल्यानंतर हे अभियान सुरु झालं. हिंदूंमध्ये जागृती करणे हा या अभियानाचा भाग आहे. योगी आदित्यनाथ यांचं 'बटेंगे तो कटेंगे' आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक हैं तो सेफ है' या दोन प्रसिद्ध वक्तव्यांचा या अभियानात संदर्भ दिला जात आहे.
( नक्की वाचा : देशात भाजपा असेपर्यंत अल्पसंख्याकांना आरक्षण मिळणार नाही, अमित शाहांचं काँग्रेसला उत्तर )
कुणाविरुद्धही अभियान नाही
RSS च्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'सजग रहो' अभियान कुणाच्याही विरोधात नाही. हिंदूंमधील जातीभेत समाप्त करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. भाजपाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि 65 पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आरएसएसच्या या अभियानामुळे हिंदू एकत्र आले तर याचा सर्वात जास्त फायदा महायुतीला होणार आहे. अगदी निवडणुकीच्या तोंडावर सुरु असलेल्या या अभियानामुळे मतदारांना एखादा पक्ष किंवा महायुतीकडं वळवण्यात मदत होईल. या अभियानाची वेळ देखील महत्त्वाची आहे, असं विश्लेषकांनी सांगितलं.