महाराष्ट्र विधानसभेसाठी चुरशीची निवडणूक झाली आहे. सर्वांना प्रतिक्षा आता निकालाची आहे. काही वेळातच महाराष्ट्राचा कौल कोणा आहे, हे समजणार आहे. चुरशीच्या लढतीत बहुमताचा आकडा गाठता आला नाही तर सत्ता स्थापनेसाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्ष व छोट्या पक्षांच्या आमदारांना संपर्क केला जात आहे. शिवाय निवडून येणाऱ्या आमदारांना तातडीने मुंबईत आणण्यासाठी विमानां बरोबर हेलिकॉप्टरची ही सोय केली गेली आहे. त्याच बरोबर राहण्यासाठी फाईव स्टार हॉटेल ही बूक करण्यात आली आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाविकास आघाडी की महायुती यांच्या सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यात कोणाला यश येतं हे काही तासात समजणार आहे. मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. दुपारपर्यंत महाराष्ट्राचे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीचे विशेष म्हणजे तब्बल 30 वर्षानंतर राज्यात विधानसभेसाठी सर्वाधिक म्हणजे 66 टक्के मतदान झाले आहे. मागिल निवडणुकीच्या तुलनेत पाच टक्के मतदान हे वाढले आहे. त्यामुळे त्याचा फायदा कोणाला होतो याबाबतही उत्सुकता आहे. त्यात एक्झिट पोलने तर राजकीय पक्षांची धाकधूक आणखी वाढवी आहे. त्यामुळे पुढची रणनितीही तयार करून ठेवण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया सकाळी सहावाजेपासून सुरु होईल. निवडणूक आयोगाचे निरीक्षक, उमेदवार, त्याचे प्रतिनिधी यांच्या समक्ष सीलबंद स्ट्रॉंग रूम उघडण्यात येतील. पोस्टल मत आणि मतदान मतमोजणी केंद्रांवर आणले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंग केले जाते. सकाळी आठ वाजता पोस्टाने प्राप्त झालेल्या मतपत्रिकांची मतमोजणी केली जाईल. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता मतदान यंत्रातील मतांची मोजणी सुरु होईल. मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
उमेदवारांचे प्रतिनिधी 17 सी फॉर्मच्या आधारे मतदान यंत्रातील मतांची पडताळणी करू शकतात. जवळपास 6 हजार 500 टेबल्सवर मतमोजणीच्या फेऱ्या पार पडणार आहेत. सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये टपाल मतपत्रिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे 288 मतमोजणी केंद्रांवर 2 हजार 732 टेबल्स टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी आणि 592 टेबल्स इटीपीबीएमएस स्कॅनिंगसाठी उभारण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीना नक्कीच वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशीरा नंदनवन या सरकारी निवासस्थानी आपल्या आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी मतदानाचा आढावा घेतला. या बैठकीत पुढची रणनिती ठरवण्यात आली आहे. त्याच बरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे. तर काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला हे मुंबईत तळ ठोकून आहेत. शरद पवारही मुंबईत आहेत.
ट्रेंडिंग बातमी - हॉटेल, चॉपर, चार्टर्ड प्लेन... निकालाच्या आधी सर्वच पक्षांची कशी आहे तयारी?
काँग्रेसने निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर आपल्या आमदारांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी नागपूर, कोल्हापूर आणि शिर्डीत विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. महाविकास आघाडीला बहुमतापर्यंत पोहचता आले नाही आणि विधानसभेचे चित्र त्रिशंकू आल्यास आमदारांना काँग्रेशासित तेलंगणा किंवा कर्नाटकात हलविण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. या काँग्रेस आमदारांसाठी हैदराबाद किंवा बंगळुरू येथील हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहे. अशी माहिती ही समोर येत आहे.