महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय. या विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांसमोर केलेल्या पहिल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्मरण करत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस हा परजीवी पक्ष बनलाय, या शब्दात त्यांनी या भाषणात हल्ला चढवला.
काय म्हणाले मोदी?
देशांच्या जडणघडणीत बाळासाहेब ठाकरेंचे मोठे योगदान आहे. काँग्रेसने शिवसेनेच्या एका गटाला आपल्याबरोबर घेतले. पण त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना कधीही मान्यता दिली नाही. काँग्रेस नेत्यांनी बाळासाहेबांचे विचार आपल्या भाषणातून सांगावे असं आव्हान मी त्यांना दिलं होतं. पण, काँग्रेसच्या नेत्यांना ते आव्हान पूर्ण करता आलं नाही. काँग्रेसच्या नेत्याने देशभर सावरकरांचा अवमान केला होता. माझ्या आव्हानानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सावरकरांवर बोलणे तात्पुरते टाळले, अशी टीका मोदींनी यावेळी केली.
काँग्रेस परजीवी पक्ष
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस हा पक्ष आहे, हे या निवडणुकीनंतर सिद्ध झालंय. काँग्रेस यापुढे कधीही स्वबळावर जिंकू शकत नाही. भारतातील सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू आहे. एका कुटुंबाची सत्तेची भूक इतकी आहे की त्यांनी स्वत:चाच पक्ष गिळंकृत केलाय, अशी टीका मोदींनी या भाषणात केली.
( नक्की वाचा : Maharashtra Election Result : PM मोदींनी समजवला निकालाचा अर्थ, सांगितला देशाचा महामंत्र )
भाजपाला सलग तीन वेळा जनादेश देणारं महाराष्ट्र हे देशातील सहावं राज्य आहे. यापूर्वी गोवा, गुजरात, छत्तीसगड, हरियाणा, आणि मध्य प्रदेशात आम्ही सलग तीन वेळा विजय मिळवला. बिहारमध्येही NDA ला तिसऱ्यांदा जनादेश मिळाला. त्याचबरोबर 60 वर्षांनी तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली. हा जनतेचा आमच्या सुशासनावरचा विश्वास आहे. तो कायम ठेवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करु, असं मोदींनी सांगितलं.
महाराष्ट्रात विकास, सुशासन आणि खऱ्या सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात खोटारडेपणा, लबाडी आणि घराणेशाहीचा पराभव झाला आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं.