Maharashtra Election Results : 29 वर्षांनंतर राज्यात सर्वाधिक मतदान, कुणाला फायदा? वाचा 7 मुद्दे

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Maharashtra Election Results 2024 : निवडणूक आयोगानं जारी केलेल्या शेवटच्या आकडेवारीनुसार राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 65.1 टक्के मतदान झालं आहे.  2019 मधील विधानसभा निवडणुकीमध्ये 61.4 टक्के मतदान झालं होतं. राज्यात गेल्या 29 वर्षांमध्ये झालेल्या निवडणुकीतील हे सर्वात जास्त मतदान आहे. यापूर्वी 1995 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत 71.69 टक्के मतदान झालं होतं.

राज्यात मतदानाची टक्केवारी वाढल्याचा फायदा कुणाला होणार? ही चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. मतदानाची टक्केवारी का वाढली? त्याचा फायदा कुणाला होणार? हे समजून घेण्यासाठी 7 मुद्दे महत्त्वाचे आहेत.

 ('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

1. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रयत्न यशस्वी झाले का?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत स्वस्थ बसले होते. पण, विधानसभेत संघ परिवार रिंगणात उतरला होता. संघ परिवाराच्या माध्यमातून मतदान वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. त्याचा फायदा मतदानाला झाला असं मानलं जातं आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे संघ परिवाराचे प्रयत्न यशस्वी झाले असतील तर त्याचा फायदा महायुती आणि विशेषत: भाजपाला होऊ शकतो.

2. व्होट जिहादमुळे ध्रवीकरण झालं?

विधानसभा निवडणुकीत 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'एक है तो सेफ है' या दोन घोषणा मोठ्या प्रमाणात गाजल्या. भाजपाच्या नेत्यांकडून हिंदुत्त्वादी मतदारांना आकर्षित करण्यासाठी या घोषणेचा वापर करण्यात आला. त्याला महाविकास आघाडीच्या पक्षांनी देखील उत्तर दिलं. 

Advertisement

मुस्लिम वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जद नोमानी यांनी दिलेला महाविकास आघाडीला पाठिंबा, उलेमा बोर्डानं काँग्रेसकडं मागण्या केल्याचं पत्रही व्हायरल झालं होती. दोन्ही बाजूमुळे झालेल्या ध्रुवीकरणामुळे देखील मतदार मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडले, असं मानलं जातं आहे. या कारणामुळे वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला होईल हे पाहावं लागेल. 

( नक्की वाचा : सज्जाद नोमानी म्हणतात, महाराष्ट्र नाही तर दिल्ली सरकारही टार्गेट! शेलारांनी शेअर केला Video )

3. 'लाडक्या बहिणीं'नी केलं मतदान

मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीत महिलांचं मोठं योगदान आहे. षतः ग्रामीण भागात महिला मतदानाची संख्या मोठी आहे. महिलांचे कमीत कमी 3 टक्क्यांनी तर जास्तीत जास्त 20 % मतदान वाढले आहे. मराठवाडा आणि विदर्भात महिलांचं मतदान वाढलं आहे. लाडकी बहीण योजना, एसटीच्या तिकीटात पन्नास टक्के सवलत, न्नपूर्णा योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत,  आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थिनींना मोफत उच्च शिक्षण, यासारख्या योजनांमुळे महिलांची टक्केवारी वाढल्याचं मानलं जातंय. 

Advertisement

( नक्की वाचा : Maharashtra Exit Polls 2024 : महाराष्ट्रात कुणाचं सरकार? पाहा काय सांगतात एक्झिट पोल )

4. सोयाबीनसह इतर पिकांचे पडलेल्या भावांमुळे आक्रोश?

विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरु असतानाच सोयाबीन आणि काही पिकांचे भाव पडल्यानं शेतकरी हवालदील झाला होता. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी दोन्ही प्रमुख आघाड्यांनी आश्वासनं दिली आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान केलं असेल तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. 

5.  गृह सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रांची उभारणी

मुंबई आणि पुणे शहरातील मोठ्या गृह सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या मतदारांच्या सोयीसाठी त्याच ठिकाणी मतदान केंद्रांची उभारणी निवडणूक आयोगानं केली होती. आयोगाच्या या निर्णयामुळे मुंबई आणि पुण्यातील अनुत्सुक मतदारांची पावलंही मतदान करण्यासाठी वळली असावीत, असं मानलं जात आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : Maharashtra Exit Poll मध्ये भाजपा का ठरलाय 'लाडका' पक्ष? वाचा अर्थ )

6. उमेदवार जास्त असल्यामुळे प्रत्येकानं मतदारासाठी प्रयत्न केले का?

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, AIMIM, तिसरी आघाडी आणि बंडखोर असे निरनिराळे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. अनेक मतदारसंघात बहुरंगी लढत होत आहे. उमेदवारांची संख्या वाढल्यानं प्रत्येक दिग्गज उमेदवारांनी आपले मतदार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असं मानलं जातंय. त्याचा फायदाही मतदानाची टक्केवारी वाढण्यात झााला आहे.

7. गावातले मतदार शहरी भागातून आणण्यात उमेदवार यशस्वी झाले?

ग्रामीण भागातील अनेक उमेदवार कामासाठी मुंबई-पुणे तसंच अन्य महानगरात असतात. नोकरीनिमित्त दुसरीकडं राहत असलेल्या या मतदारांना अनेकदा मतदानासाठी गावी जाता येत नाहीत. या मतदारांनी मतदानासाठी गावी यावं यासाठी अनेक पक्षांच्या उमेदवारांना यंदा जोरदार प्रयत्न केले. त्यांना गावी मतदान करता यावं यासाठी वेगवेगळ्या सुविधा दिल्या. त्यामुळे देखील ग्रामीण भागात मतदानाचं प्रमाण वाढलं आहे, असं मानलं जातंय.