- महाराष्ट्रातील 2026 मधील महापालिका निवडणुकीत विविध पक्षांनी स्थानिक समीकरणांनुसार आघाडी केली आहे
- मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीशी, तर शिवसेनेने मनसेशी युती केली आहे
- पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांनी आपापल्या आघाड्यांना बाजूला सारून संयुक्त युती केली आहे
जीतेंद्र दीक्षित
महानगरपालिकां निवडणुकींची राज्यात धूम आहे. राज्याच्या राजकारणात महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन मोठ्या आघाड्या अस्तित्वात आहेत. मात्र होवू घातलेल्या महापालिका निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपल्या सोयीनुसार स्थानिक समीकरणे जुळवली आहेत. यात विचारधारेपेक्षा विजयाचे गणित महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे तोंड वेगवेगळ्या दिशेला असल्याचं पाहायला मिळत आहे. 2026 या वर्षातली महाराष्ट्रातली सर्वात मोठी निवडणूक होत आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महापालिकेची ओळख आहे. एखाद्या छोट्या राज्याच्या विधानसभे प्रमाणेच ही निवडणूक समजली जाते. इथं नगरसेवक निवडून दिले जातात. मुंबई महापालिके प्रमाणेच राज्यातील 28 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. ज्यामध्ये ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि कोल्हापूर या मोठ्या शहरांचा समावेश आहे. इथं ही एक अशी कोणाची ही आघाडी नाही. कोल्हापुरात महायुतीचे घटकपक्ष एकत्र आहेत. पण इथ मविआ एकत्र निवडणूक लढत नाही अशी स्थिती आहे.
या निवडणुकीत राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. मुंबई महापालिकेत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीशी हातमिळवणी केली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने राज ठाकरे यांच्या मनसेशी युती केली आहे. विशेष म्हणजे मनसे पहिल्यांदाच कोणाशी तरी युती करून मैदानात उतरत आहे. दुसरीकडे, महायुतीमध्ये असूनही अजित पवार यांची राष्ट्रवादी मुंबईत स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. तर शिवसेना शिंदे गट आणि भाजपती मुंबई महापालिकेत युती झाली आहे. 3 जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी खरी स्थिती स्पष्ट होणार आहे. पुण्याचं बोलायचं झाल्यास तिथे काका-पुतण्या एकत्र येत आहे. सर्वात धक्कादायक आणि चर्चेची युती पिंपरी-चिंचवडमध्ये पाहायला मिळत आहे. येथे शरद पवार आणि अजित पवार यांनी आपापल्या आघाड्यांना बाजूला सारून एकमेकांशी हातमिळवणी केली आहे. जुलै 2023 च्या फुटीनंतर काका-पुतण्या पहिल्यांदाच एकत्र आले असून, याचे परिणाम भविष्यातील राज्यावर होतील अशी चर्चा आहे.
1999 ते 2019 पर्यंत महाराष्ट्रात दोन आघाड्या अस्तित्वात होत्या. एक म्हणजे शिवसेना भाजपची युती आणि काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी. मात्र यात बदल झाला तो 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर. या निवडणुकीनंतर शिवसेनेनं भाजपचा हात सोडला. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी केली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या क्रमांकावर होती. पण शिवसेना आणि भाजपमध्ये असलेल्या मतभेदांचा फायदा पवारांनी उचलला. त्यांनी युती तोडली आणि शिवसेनेला आपल्या सोबत घेतले. शिवाय राज्यात राष्ट्रवादीसह काँग्रेसला ही सत्तेत आणलं. या आघाडीत काँग्रेसला ही समावून घेण्यात त्यांनाच मोठा वाटा राहीला. या आघाडीचं सुरूवातीला नाव महाशिव आघाडी ठेवण्यात आलं होतं. पण नंतर सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून ते महाविकास आघाडी करण्यात आलं.
पुढे 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली. त्यांनी शिवसेना हायजॅक केली. मोठ्या प्रमाणात आमदार त्यांच्या सोबत गेले. त्यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवाय निवडणूक आयोगाने ही शिंदेंचीच शिवसेना ही खरी शिवसेना असल्याची मान्यता दिली. त्यानंतर पुन्हा एकदा भाजप शिवसेना युती अस्तित्वात आली. त्यानंतर जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीत ही फुट पडली. अजित पवारांनी वेगळी चुल मांडली. त्यांनी ही भाजपची साथ देण्याचा निर्णय घेतला. ते महायुतीत सहभागी झाले. त्यांना ही निवडणूक आयोगाने खरी राष्ट्रवादी म्हणून मान्यता दिली. त्यामुळे राज्यात तीन-तीन मोठ्या पक्षांचे दोन आघाड्या राज्यात अस्तित्वात आहेत. त्यात एक भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी ही महायुती आहे. तर दुसरीकडे काँग्रेस- शिवसेना ठाकरे- राष्ट्रवादी शरद पवार यांची आघाडी आहे. लोकसभा आणि विधानसभेला महायुती विरुद्ध आघाडी असाच सामना झाला. पण आता महापालिकांसाठी हे वेगवेगळे झाल्याचे दिसत आहेत.