विधानसभेच्या रिंगणात 'हा' उमेदवार सर्वात लहान वयाचा ? सर्वात जास्त वय कुणाचे?

उमेदवार आपले प्रतिज्ञापत्र दाखल करत आहेत. त्यातून त्यांची संपत्ती किती? त्यांच्यावर गुन्हे किती? त्यांचे शिक्षण, वय या गोष्टी मतदारांना समजत आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीसाठी आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी उमेदवार आपले प्रतिज्ञापत्र दाखल करत आहेत. त्यातून त्यांची संपत्ती किती? त्यांच्यावर गुन्हे किती? त्यांचे शिक्षण, वय या गोष्टी मतदारांना समजत आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जावरून सर्वात लहान वयाचा उमेदवार कोण हे समोर आले आहे. तर सर्वात जेष्ठ उमेदवार कोण हे ही स्पष्ट झाले आहे. शिवाय त्यांच्या संपत्तीचीही माहिती या माध्यमातून पुढे आली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या विधानसभा निवडणुकीत सर्वात कमी वयाचा उमेदवार जर कोण असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे रोहित आर. आर. पाटील आहेत. त्यांचे आताचे वय हे 25 वर्ष आहे. ते सर्वात लहान वयाचे उमेदवार ठरले आहेत. त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तासगाव विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दाखल केली आहे. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचाही उल्लेख केला आहे. त्यांच्याकडे 36 हजाराची रोख रक्कम आहे. त्यांच्या नावावर एकही गाडी नाही. त्यांच्याकडे 1 लाख 60 हजार रुपयांचे दागिने आहेत. त्याच बरोबर चल मालमत्ता 28 लाख 42 हजार रुपये, तर अचल मालमत्ता 86 लाख 80 हजार रुपये आहे. 

ट्रेंडिंग बातमी - भाजप आपले नेते राष्ट्रवादीत का पाठवतेय? अजित पवारांवर भाजप नेत्यांना उमेदवारी देण्याची वेळ का?

एकीकडे रोहित पाटील हे विधानसभेच्या रिंगणातील सर्वात लहान वयाचे उमेदवार ठरले आहेत. अशा वेळी सर्वात वयोवृद्ध उमेदवार कोण? याचीही चर्चा आहे. यामध्ये तीन वरिष्ठ नेत्यांचा समावेश होत आहे. सर्वात जास्त वयाचे उमेदवार हे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आहे. त्यांना काँग्रेसने कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. त्यांचे वय 78  वर्षे आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. ते पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात आहेत.त्यांची लढत भाजपच्या अतूल भोसले यांच्या बरोबर होत आहे.  

ट्रेंडिंग बातमी - ठाकरे विरुद्ध शिंदे, पवार विरुद्ध पवार! किती आणि कोणत्या मतदार संघात भिडणार?

पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर वयाने जेष्ट असलेले उमेदवार आहेत ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांचे. छगन भुजबळ यांचे वय 77 वर्ष आहे. ते राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून येवल्यातून विधानसभा निवडणूक लढत आहेत. त्यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भुजबळ हे 12.50 कोटींचे मालक आहेत. त्यांच्या नावावर  ट्रॅक्टर हे एकमेव वाहन आहे. शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी शेत जमिनही आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर भुजबळ हे या विधानसभेत वयाने सर्वात जेष्ठ आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - महायुतीकडून महाविकास आघाडीची हवाई कोंडी! सर्व हेलिकॉप्टर बुक, तासाचं भाडं किती?

चव्हाण आणि भुजबळांनंतर जर वयाने कोणी जेष्ठ असेल तर ते आहेत कम्युनिष्ट पक्षाचे उमेदवार जीवा पांडू गावित. जीवा पांडू गावित हे दहाव्यांदा कळवण या मतदार संघातून निवडणूक मैदानात आहेत. त्यांनी सात वेळा  या मतदार संघातून विजय मिळवला आहे. तर तीन वेळा त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. जीवा पांडू गावित यांचे वय 75 वर्षे आहे. ते तीसऱ्या क्रमांकावरचे वयाने सर्वात जेष्ठ उमेदवार आहेत. त्यांच्या नावावर इनोव्हा कार आहे. त्याची किंमत 19 लाख इतकी आहे. शिवाय त्यांच्या नावावर एक ट्रॅक्टरही आहे. त्याची किंमत 5 लाख रुपये आहे. त्याच बरोबर चल मालमत्ता 2 कोटी 63 लाख तर अचल मालमत्ता 1 कोटी 7 लाख रूपयांची आहे.