फडणवीसांचा 'राम' अडचणीत, उमेदवारी देण्यास भाजपामध्येच होतोय विरोध

Ram Satpute : सोलापूर जिल्ह्यातील माळशीरस या राखीव मतदारसंघातील भाजपामधील अंतर्गत धुसफूस आता उघड होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
माळशिरस, सोलापूर:

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील माळशीरस या राखीव मतदारसंघातील भाजपामधील अंतर्गत धुसफूस आता उघड होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे समजले जाणारे राम सातपुते सध्या माळशिरसमध्ये आमदार आहेत. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सातपुते सोलापूर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार होते. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. त्यापाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर राम सातपुते मतदारसंघात सक्रिय नसल्याने आता स्थानिक भाजपा कार्यकर्त्यास विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार असणारे राम सातपुते आपल्या विधानसभा क्षेत्रात फिरकलेच नाहीत. त्यामुळे स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी धनगर समाजाचे नेते आणि माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती किशोर सुळ यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सुळ यांनी भाजपा वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून मतदार संघातील गाठी भेटी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी माळशिरस तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांचे एकत्रीकरण केले आहे.

माळशिरस तालुका हा मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो. या लोकसभा निवडणुकीतील भाजपा उमेदवाराचा वचपा काढण्यासाठी आता माळशिरस तालुक्यातील भाजपा आक्रमक झाली आहे. याचाच भाग म्हणून नुकतीच भाजपा पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत स्थानिक उमेदवाराला पाठिंबा देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे माळशिरस विधानसभा मतदार संघात भाजपा आमदार राम सातपुते हे  निवडणूक लढवणार असतील तर स्थानिक भाजपा कार्यकर्ते काय भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपाला आणखी एक हादरा बसणार, बडा नेता कुटुंबासह पक्ष सोडणार? )

कोण आहेत राम सातपुते?

ऊसतोड कामगाराचा मुलगा ते आमदार असा प्रवास राम सातपुते यांनी केलाय. मुळचे बीड जिल्ह्यातील असलेल्या सातपुते यांचे आई-वडील ऊस तोडणीच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील माळशीरसमध्ये स्थायिक झाले. सातपुते पुण्यात शिक्षणासाठी असताना त्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (अभाविप) संबंध आला. अभाविपनंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. 2019 साली ते माळशिरसमधून पहिल्यांदा आमदार झाले. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र पराभव सहन करावा लागला.