लोकसभा निवडणुकीचे निकाल आता जाहीर झाले आहे. सर्वच राजकीय पक्ष निकालाचे विश्लेषण करत आहे. जय पराजयाची गणित तपासली जात आहेत. महाविकास आघाडीने राज्यात जोरदार मुसंडी मारत तब्बल 31 जागा जिंकल्या आहेत. यात आणखी चार जागांची भर पडली असती असे आता समोर आले आहे. शरद पवारांसह संजय राऊत नाना पटोले यांनीही निवडणुकी पूर्वी आघाडी 35 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला होता. मात्र तो अंदाज थोडक्यात चुकला आहे. आघाडीला चार जागा कमी पडल्या. मात्र या चार जागा कमी होण्यास वंचित बहुजन आघाडीने घेतलेली मते कारणीभूत ठरल्याचेही आता स्पष्ट होत आहे. राज्यातल्या चार मतदार संघात याचा आघाडीला फटका बसला. वंचित मुळे चार मतदार संघात आघाडीचे उमेदवार जिंकता जिंकता हरल्याचे स्पष्ट झाले आहेत.
ते मतदार संघ कोणते?
वंचित मुळे आघाडीच्या चार जागा हातच्या गेल्याचे स्पष्ट झाले आहेत. त्यात अकोला, बुलढाणा, उत्तर पश्चिम मुंबई आणि हातकणगले या लोकसभेच्या जागांचा समावेश आहे. अकोल लोकसभेत काँग्रेसचे डॉ. अभय पाटील हे निवडणूक रिंगणात होते. त्यांचा भाजपच्या अनुप धोत्रे यांनी 40 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. इथे वंचितचे प्रकाश आंबेडकर हे मैदानात होते. त्यांनी जवळपास दोन लाखाच्या आसपास मते घेतली. प्रकाश आंबेडकर हे आघाडीत असते तर ते इथून विजयी झाले असते. किंवा काँग्रेसचा उमेदवार सहज विजयी झाला असता. मात्र मत विभाजनामुळे आघाडीच्या उमेदवाराला इथे फटका बसला.
बुलढाणा मतदार संघातही फटका
बुलढाणा लोकसभा मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे विजयी झाले आहेत. त्यांनी ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर यांचा 29000 मतांनी पराभव केला. या मतदार संघातही वंचित फॅक्टर खेडेकरांच्या पराभवाला कारणीभूत ठरला आहे. वंचितचे उमेदवार वसंतराव मगर यांनी तब्बल 98 हजार मते घेतली. त्यामुळे खेडेकर यांच्या पराभवात हातभार लागला. जर वंचितचा या मतदार संघात पाठींबा असता तर खेडेकर हे सहज विजयी झाले असते. मात्र त्यांना पराभव चाखावा लागला.
हातकणगले मतदार संघातली तेच घडले
हातकणगले लोकसभा मतदार संघातही वंचितच्या उमेदवारामुळे आघाडीच्या उमेदवाराला पराभव सहन करावा लागाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशिल माने यांनी शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांचा निसटत्या फरकाने म्हणजे 13,000 हजाराने पराभव केला. इथे वंचितकडून डी. सी. पाटील मैदानात होते. त्यांनी तब्बल 32 हजार 696 मते घेतली. त्याचा थेट फटका सत्यजित पाटील यांना बसला. या मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टीही मैदानात होते. त्यांनाही 1 लाख 79 हजार 850 मते मिळाली आहेत. त्यांनी ही आघाडीला मदत केली असती किंवा आघाडी उमेदवारी म्हणून मैदानात उतरले असते तर त्यांचाही विजय पक्का झाला असता.
उत्तर पश्चिम मुंबईत निसटता पराभव
उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागलेला पराभव म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा आहे. या मतदार संघातून अमोल कीर्तिकर यांना अवघ्या 48 मतांनी पराभव पत्करावा लागला. इथे शिवसेना शिंदे गटाचे रविंद्र वायकर हे विजयी झाले. या मतदार संघातही वंचितचा फॅक्टर चालला. वंचितचे परमेश्वर अशोक रणशौर हे मैदानात होते. त्यांना दहा हजारा पेक्षा जास्त मते इथे मिळाली.