ओंकार कुलकर्णी, प्रतिनिधी
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निकाल आता स्पष्ट होत आहेत. दरम्यान धाराशिवमधून शरद पवार गटाला जबर धक्का बसला आहे. सुनेत्रा पवारांचे भाचे जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा धाराशिव जिल्हा परिषदेच्या तेर गटातून दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी शरद पवार गटाच्या सक्षणा सलगर यांचा पराभव केला आहे. धाराशिवमधील तेरच्या या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं. कारण ही लढत घराणेशाही, पक्षबदल आणि भावनिक मुद्द्यांभोवती फिरत होती. अजित पवारांनी विमान अपघाताआधी ज्यांना शेवटचा फोन केला ते हे राणा जगजितसिंह पाटील.
सक्षणा सलगर यांना अवघे १ हजार २५३ मतं...
अजित पवार जगजितसिंहांना म्हणाले होते, आता बारामतीला निघालोय. पोहोचल्यावर बोलू. राणा जगजितसिंहांशी अजित पवारांचं शेवटचं बोलणं झालं होतं. राणा जगजितसिंह हे भाजपचे आमदार आणि अजित पवारांचे भाचे. राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर घराणेशाहीचा जोरदार आरोप झाला. त्यामुळे अर्चना पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दाखवली होती. मात्र, शेवटच्या क्षणी भाजपनं त्यांना अर्ज कायम ठेवण्याचा आदेश दिला. पक्षादेश मानून अर्चना पाटील यांनी ही निवडणूक लढवली आणि अखेर त्यांचा विजय झाला. अर्चना पाटील यांना 7 हजार 597 मतांसह विजयी झाल्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार कीर्तिमाला खटावकर यांना 5 हजार 237 मते मिळाली. शरद पवार गटाच्या सक्षणा सलगर यांना फक्त 1 हजार 253 मत मिळाली.
सक्षणा सलगर यांचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप
विशेष म्हणजे यापूर्वी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या अर्चना पाटील पराभूत झाल्या होत्या. तर शरद पवार गटाच्या सक्षणा सलगर या गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. सक्षणा सलगर म्हणजे शरद पवार गटाच्या आक्रमक नेत्या आणि मुलुख मैदानी तोफ. तेरमध्ये भाजप विरुद्ध शरद पवार गट अशा थेट लढतीत त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर सक्षणा सलगर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
ओमराजे निंबाळकर यांचा माझ्याविरोधात भावजयीला निवडून आणण्याचा प्लॅन यशस्वी झाला, असं म्हणत सलगर यांनी थेट ओमराजेंवर निशाणा साधलाय. त्याचबरोबर निवडणुकीत मराठी विरुद्ध ओबीसी वाद लावल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला आहे..
धाराशिव जिल्ह्यातली राजकीय समीकरणं बदलली
राणा जगजितसिंहांचे वडील पद्मसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर हे चुलतभाऊ. पण २००६ मध्ये पवनराजे निंबाळकरांची हत्या झाली आणि त्यानंतर दोन्ही घरांमध्ये संघर्ष सुरू झाला. आता तेरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून अर्चना पाटील विरुद्ध शरद पवार गटाच्या सक्षणा सलगर असा सामना होता. मात्र त्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांनी कीर्तिमाला खटावकर यांनाही ठाकरेंच्या शिवसेनेकडून रिंगणात उतरवलं. अखेर भाजपच्या अर्चना पाटील जिंकल्या, ठाकरेंच्या उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर तर सक्षणा सलगर तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. त्यामुळेच ओमराजेंनी आपल्या पराभवासाठी काम केल्याचा आरोप सलगर यांनी केला. आता अर्चना पाटील यांच्या विजयाने भाजप तेरमध्ये मजबूत झालाय. या निकालामुळे धाराशिव जिल्ह्यातली राजकीय समीकरणं बदलली आहेत.