प्रतिनिधी, अझरोद्दीन शेख
धाराशिव लोकसभेसाठी महायुतीकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाल्यावर त्यांनी जिल्हाभरात प्रचाराचा मोठा धडाका लावला आहे. अर्चना पाटील यांचे मोठे चिरंजीव मल्हार पाटील हे देखील आई लोकसभेच्या निवडणुकीत निवडून यावी यासाठी मोठे प्रयत्न करताना दिसतायत. दरम्यान, एका प्रचारसभेदरम्यान त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांच्या सहमतीनेच आम्ही 2019 ला राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याचं मल्हार पाटील यांनी म्हटलं आहे. मल्हार पाटील यांच्या या वक्तव्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय म्हणाले मल्हार पाटील?
गेल्या काही दिवसांपूर्वी पाटील कुटुंबाचे कट्टर विरोधक आणि महाविकास आघाडीचे धाराशिव लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील यांना महायुतीची उमेदवारी मिळाल्यावर पाटील कुटुंबावर टीका करत म्हटलं होत की, पाटील कुटुंबाने अजित पवार यांना कंटाळूनच राष्ट्रवादी सोडली होती. या टीकेला उत्तर देताना मल्हार पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आणि अजित पवार यांच्या सहमतीने 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि मी हे अतिशय जबाबदारीने सांगतो. त्यांनी आम्हाला आधी पाठवलं आणि नंतर ते भाजप बरोबर आले असं मल्हार पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मल्हार पाटील यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा- महायुतीचं जागा वाटप अडलं? भाजपचा नवा प्रस्ताव, दादा-भाई काय करणार?
भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश घेत मिळवली उमेदवारी
शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी वाढवण्याचे काम पाटील कुटुंबातील पद्मसिंह बाजीराव पाटील यांनी केलं आहे. तब्बल 40 वर्षे शरद पवार यांच्या सोबत अनेक पदे देखील भूषवली. आमदार, खासदार, राज्याचे गृहमंत्री, पाटबंधारे मंत्री अशी महत्वाची खाती पद्मसिंह पाटील यांना देण्यात आली होती. त्यानंतर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणाजगजीत सिंह पाटील यांना कुठलाही अनुभव नसताना विधान परिषदेत आमदार करत राज्यमंत्रिपद देखील शरद पवारांनी दिले. मात्र पवार यांच्या वाईट काळात 2019 मध्ये पाटील कुटुंबाने राष्ट्रवादीच्या घड्याळाची साथ सोडली आणि थेट भाजपमध्ये प्रवेश केला. 2024 मध्ये अजित पवार गटाला धाराशिव लोकसभेची जागा सुटल्याने खासदारकी आणि जिल्ह्याचे नेतृत्व आपल्याकडे राहावं म्हणून मोठी खेळी करण्यात आली. अर्चना पाटील यांचा प्रवेश भाजपातून थेट राष्ट्रवादी अजित पवार गटात घेण्यात आला आणि त्यानंतर लगेच लोकसभेची उमेदवारी देखील पाटील कुटुंबाने आपल्या पदरात पाडून घेतली.