लोकसभा निवडणुकीत मतदारांची उदासीनता मागील चार टप्प्यामध्ये दिसून आली आहे. लोक मतदान करण्यासाठी येत नसल्याने निवडणूक आयोगाने देखील चिंता व्यक्त केली होती. मतदान करण्यासाठी मतदारांना विविध प्रकारे आवाहन केले जात आहे. मात्र आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जवळपास 50 हजार खर्च करुन 1900 किलोमीटरचा करुन मुंबईत आलेल्या एका मतदाराचा हिरमोड झाला आहे. केवळ प्रशानसनाच्या सावळ्या गोंधळामुळे या मतदाराला आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावं लागलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निशित पारेख असं या मतदाराचं नाव आहे. निशित खास मतदान करण्यासाठी दुबईहून मुंबईत आले होते. मात्र मतदार यादीत त्यांचं नावच नसल्याना त्यांना मतदान करता आलेलं नाही.
(नक्की वाचा- पालघरमध्ये मतदार याद्यांमध्ये गोंधळ, मतदानापासून वंचित राहिल्याने मतदारांचा संताप)
निशित दुबईहून मतदान करण्यासाठी 18 मे रोजी मुंबईत पोहोचले होते. मतदान करुन लगेचच आज म्हणजेच 20 मे रोजी ते पुन्हा दुबईसाठी निघणार होते. तसं त्यांनी विमानाचं तिकीट देखील बुक केलं होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 च्या निवडणुकीत त्यांनी मतदान केले होते.
निशित यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ते घाटकोपर पश्चिम येथील मतदान केंद्रावर 7 वाजेच्या आधीच पोहोचले होते. तिथे गेल्यानंतर त्यांनी मतदार यादीत आपलं नाव शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचं नावच मतदार यादीत सापडलं नाही. मतदान करण्यासाठी एवढा लांबचा प्रवास करुन ते आल्याने त्यांनी तिथे खूप चौकशी केली. जवळपास 11 वाजेपर्यंत ते मतदार केंद्रावर थांबले होते. मात्र मतदान करता येणार नाही, हे निवडणूक कर्मचाऱ्यांनी कळवल्यानंतर ते निराश होऊन घरी परतले.
(नक्की वाचा - धुळ्यात मतदानाचा उत्साह; 92 वर्षाच्या आजीबाई वनिता पटेलांनी बजावला मतदानाचा हक्क)
निशित यांनी या घटनेवरुन संताप व्यक्त केला आहे. एखाद्या अनिवासी भारतीयाने (NRI) आपला पासपोर्ट जमा केलेला नसेल, मतदान कार्ड परत केले नसेल तर त्याचं नाव मतदार यादीतून कसं काढलं जाऊ शकतं? असा सवाल त्यांनी विचारला. मी भारतीय पासपोर्ट होल्डर आहे तर मला मतदान करण्याच अधिकार आहे. मी माझा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केलेली मेहनत वाया गेली आहे, अशी प्रतिक्रिया निशित पारेख यांनी दिली आहे.