विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मराठा समाजाची एक महत्वाची बैठक आज अंतरवाली सराटीत होत आहे. मनोज जरांगे पाटील या बैठकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीत समाजाची काय भूमीका असेल ते जाहीर करणार आहेत. लढणार की पाडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे जरांगे काय निर्णय घेतात यावर विधानसभेची गणितं ही ठरणार आहेत. अनेक इच्छुकांनी उमेदवारी मिळावी यासाठी जरांगे पाटील यांच्याकडे मुलाखत दिल्या आहेत. जर निवडणुका लढल्या तर मराठा समजाला फायदा होईल असे मानणारा मोठा वर्ग आहे. तर दुसरीकडे राजकारणात न जाता लोकसभे प्रमाणे धोरण स्विकारावे असे सांगणाराही मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यातून कोणता मार्ग जरांगे स्विकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीबाबत आपली भूमीका गुलदस्त्यात ठेवली आहे. शिवाय जवळपास 800 जणांनी जरांगे यांच्याकडे उमेदवारीही मागितली आहे. त्यांच्या मुलाखती ही घेण्यात आल्यात. जवळपास 120 मतदार संघाचा आढावाही घेण्यात आला. त्यात पोषक वातावरण असल्याचेही सांगितले गेले. या सर्व पार्श्वभूमीवर आता जरांगे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारमध्ये जावून स्वत: निर्णय घ्यायचा की सरकार बदलून दुसऱ्या सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडायचे याचा विचार जरांगे करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर विधानसभेची सर्व गणितं ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी महायुतीला दणका दिला होता. पाडायचे आदेश त्यांनी दिले होते. त्यामुळे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला त्याचा फटका बसला होता. तर महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली होती. हा अनुभव पाहाता महायुतीतल्या सर्वच पक्षांनी जरांगें बरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कधी भाजपचे नेते तर कधी शिंदे गटाचे नेते जरांगेंना भेटून जात आहेत. भेटीगाठींचा सिलसीला सुरू आहे. मात्र आपला निर्णय 20 तारखेलाच असे जरांगेंनी सांगितले आहे. त्यामुळे ते आज काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
ट्रेंडिंग बातमी - मविआत फूट? 'ते' दोन पक्ष बाहेर पडणार? एकाने उमेदवार जाहीर केला तर दुसऱ्याने थेट...
मराठवाड्यात मराठा आंदोलनाची तिव्रता जास्त आहे. त्याची प्रचेती लोकसभा निवडणुकीत आली. राज्यातील अनेक मतदार संघात मराठा समाजाची मोठी ताकद आहे. तर काही मतदार संघ मराठा समाजाच्याच प्रभावाखाली आहे. समजा ठरवेल तो आमदार अशी स्थिती आहे. सध्याच्या स्थितीत राज्यातही मराठा आमदारांचेच प्राबल्य आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता समाज एकत्र झाला अन् लढला तर वेगळा निकाला लागू शकतो अशी एक चर्चा आहे. त्यामुळे जरांगे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर त्याचा फटका महायुतीला की महाविकास आघाडीला बसणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. पण जर जरांगे मैदानात उतरले नाही तर त्याच फायदा कोणाला याचेही तर्क लावले जात आहेत.