Mumbai Mayor News: मुंबईमध्ये महापौर कोणत्या पक्षाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. या चर्चांदरम्यान मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महापौरपदी कोण विराजमान होणार? याबाबत मोठं विधान केलंय.
कोणतंही पद मिळवण्यासाठी आम्ही आग्रही नाही: अमित साटम
मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्यासाठी काम करत नाही तर तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरिता काम करतो आणि त्यामुळे कोणतंही पद मिळवण्याकरिता आम्ही आग्रही नाही. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचारविरहित प्रशासन देणे आणि मुंबई शहराचा विकास घडवून आणणं आणि ज्यावेळेला मुंबई शहराचा विकास होतोय त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित ठेवणं हे आमचे लक्ष आहे, उद्देश आहे. त्या उद्देशाशी आम्ही कटिबद्ध आहोत.
(नक्की वाचा: Who Will Be The Next Mayor Of Mumbai: मुंबईचा महापौर भाजपचाच, BJPच्या वरिष्ठ नेत्यांची NDTVला माहिती)
मुंबईच्या महापौरपदी कोण विराजमान होणार?
तडजोडीचा विषयच नाही. महायुतीचे 118 नगरसेवक जिंकून आले असल्याने महायुतीचाच महापौर विराजमान होईल. मुंबईचा महापौर शिवसेनेचा का भाजपचा होईल हे महत्त्वाचे नाही. मुंबईला भ्रष्टाचारविरहीत प्रशासन देणे महत्त्वाचे आहे.कोणत्याही एका पक्षाला महापौर पद मिळणं इतकी ही छोटी निवडणूक नव्हती. ही मुंबईच्या पिढ्यांचं भविष्याचं रक्षण करणारी निवडणूक होती. आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेलेला आहोत आणि आमचे 118 नगरसेवक निवडून आलेले आहेत.
दुसरीकडे 30 जानेवारीला भाजपचाच महापौर होणार आणि शिवसेनेच्या दबाव तंत्राला बळी पडणार नाही, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी 'NDTV'ला दिलीय.