Maharashtra Municipal Corporation Election 2026 : आज राज्यातील २९ महानगरपालिकांसाठीचे मतदान पार पडत आहे. सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील कित्येक मतदान केंद्रांवर सकाळपासून गोंधळाचं वातावरण सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदानाची सुरुवातच उशीरा झाली. तर थेट मतदार यादीतून नाव गायब झाल्याच्या तक्रार येत आहेत. या गोंधळात मतदान करताना बोटावर लावली जाणारी शाई लगेच पुसली जात असल्याच्या व्हिडिओने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
यंदा निवडणूक आयोगाकडून बोटांवर शाईऐवजी पेन वापरलं जात आहे. साध्या नेलपेन्ट रिमुव्हरने बोटावरील शाई सहज पुसली जात असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहे. विशेष म्हणजे सत्तेत असलेले मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री यांनीही अशा घटनेतून दुबार मतदानाची भीती व्यक्त केली आहे.
रुपाली चाकणकरांची कारवाई मागणी
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज पोलिसांना सोबत घेऊन एका भाजप उमेदवाराच्या बुथवर अचानक भेट दिली. येथे मतदारांच्या बोटांवर लावण्यात येणाऱ्या ‘लिक्विड' (शाई) संदर्भात गंभीर तक्रारी आल्याने त्यांनी थेट जाब विचारला. मतदानानंतर मतदाराच्या बोटावर लावली जाणारी शाई काही ठिकाणी सहज पुसली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा प्रकार होऊ शकतो, असा संशय व्यक्त करत रूपाली चाकणकर यांनी यावर तातडीने पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली. “जर बोटावर लावलेली शाई सहज निघत असेल, तर निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात येते. अशा प्रकारे पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. याची गंभीर दखल घ्यावी,” असे चाकणकर यांनी सांगितले. या भेटीमुळे संबंधित बुथ परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने वापरण्यात येणाऱ्या शाईबाबतही आता स्पष्टीकरण देण्याची मागणी होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाटांनीही व्यक्त केली भीती...
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट मतदान केंद्रावर दाखल झाले. ते म्हणाले, मार्कर पेनने बोटाला शाई लावणे हे पहिल्यांदाच घडतं आहे. म्हणून बहुतेक ठिकाणी नाही पण काही ठिकाणी बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कडक लक्ष ठेवावे. भाजपाने काय केलं याची मला कल्पना नाही. मात्र जे वेगवेगळे स्टेटमेंट येत आहे, त्यावरुन निश्चित सांगेल आपण लोकशाहीत जनतेचे सेवक आहोत ही भावना ठेवली पाहिजे. काही लोक मालकाच्या भूमिकेत जात आहेत त्यांना जनतेने आपापल्या पद्धतीने धडा शिकवला तर त्यात गैर नाही.
शिवसेना ठाकरे गटाच्या साईनाथ दुर्गेची व्हॉट्सअॅप पोस्ट व्हायरल...
मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यासाठी आज मार्कर पेन वापरलं जातंय, ती शाई सहज पुसली जात आहे. शिवसैनिक, महाराष्ट्रसैनिक आणि शिवशक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की सतर्क रहा, शाई पुसली जाण्याचा कोणी गैरफायदा घेत नाही ना ह्याकडे लक्ष द्या! गाफिल राहू नका!, अशी पोस्ट शिवसेना ठाकरे गटाचे साईनाथ दुर्गे यांनी केली आहे.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचाही व्हिडिओ आला समोर..
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी स्वत:च्या बोटावरील शाई पुसरल्याचा दावा केला आहे. इतकच नाही तर पत्नीच्या बोटावरील साई नेलपेन्ट रिमुव्हरच्या साहाय्याने पुसल्याचं प्रात्यक्षितही दाखवलं आहे.