PM Oath-Taking Ceremony : मुरलीधर मोहोळ हे तर खरे पुण्याचे नवनिर्वाचित खासदार. पहिल्यांदाच खासदार झाल्याचा आनंद अजूनही कायम असताना त्यात आणखी एक सुखद धक्का मिळाला आहे. कार्यकर्ते विजयाचा आनंद अजून साजरा करत असतानाच मुरलीधर मोहोळ यांना आनंदाची बातमी मिळाला आहे. पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेल्या मोहोळ यांना केंद्रीय मंत्रीमंडळात संधी मिळणार आहे. ते मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. खासदार झाल्यानंतर मंत्रीपदाची त्यांना लॉट्री लागली आहे.
राजकारणात येण्याआधी कुस्तीच्या आखाड्यात
मुरलीधर मोहोळ यांनी राजकारणात येण्या आधी कुस्तीचे मैदान गाजवले होते. मोहोळ कुटुंब आणि कुस्ती असे एक वेगळे नाते आहे. मुरलीधर मोहोळ यांचे आजोबा, वडील आणि काका हे पैलवान होते. त्यांचा मोठा भाऊही कुस्तीपटू होता. त्यामुळे लहानपणा पासून त्यांना कुस्तीचे धडे मिळाले होते. पुण्यात त्यांनी प्राथमिक शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर कुस्तीत करिअर करण्यासाठी ते कोल्हापूरला गेले. पुढे महाविद्यालयीन आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांनी कुस्तीत नाव कमावले. पुढे कोल्हापुरातील महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाल्यानंतर ते पुण्यात पुन्हा आले. त्यावेळी गोपिनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी मोहोळ यांना प्रभावीत केले. आणि त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली.
मोहोळ यांचा राजकारणात प्रवेश
1993 साली भाजपमध्ये गोपिनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांचा दबदबा होता. भाजपचा तो संघर्षाचा काळ होता. याच काळात मुरलीधर मोहोळ यांनी राजकारणात प्रवेश केला. माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या संपर्कात ते आले. त्यानंतर त्यांनी राजकारणातला आखाडा गाजवायला सुरूवात केली. सुरूवातीला त्यांनी पक्ष संघटनेत काम केले. वार्ड सरचिटणीस पदापासून त्यांनी सुरूवात केली. नंतर वार्ड अध्यक्ष म्हणूनही काम केले. संघटन कौशल्य पाहाता त्यांच्यावर भारतीय युवा मोर्च्याच्या शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष करण्यात आले. पुढे युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव ही झाले.
पुणे शहरात दबदबा
मुरलीधर मोहोळ यांना पुढे पुणे शहराच्या सरचिटणिसपदी नियुक्ती करण्यात आली. नंतर त्यांना बढती देत प्रदेश सरचिटणीस म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. पुण्यात त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. अशा वेळी 2002 मध्ये पहिली निवडणूक लढली. पुणे महापालिकेतून पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 2007, 2012, आणि 2017 असे सलग चार वेळा ते पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. भाजपची पुणे महापालिकेत सत्ता आल्यानंतर त्यांना स्थायी समितीचे अध्यक्ष करण्यात आले. पुढे 2019 ते 2022 पर्यंत ते पुण्याचे महापौर होते.
थेट लोकसभेत विजयी
पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपची उमेदवारी मिळण्यासाठी जोरदार रस्सीखेच होती. शेवटी मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. त्यांच्या विरोधात काँग्रेसने रविंद्र धंनगेकर यांना उमेदवारी दिली होती. दोघांनी महापालिकेत काम केले होते. त्यामुळे सर्व सामान्यां बरोबर त्यांची नाळ जुळली होती. अशा स्थिती ही लढत रंगतदार होणार अशीच चर्चा होती. प्रचारातही दोघांनी मुसंडी मारली होती. पंतप्रधान मोदींनी मोहोळ यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती. तर राहुल गांधी धंगेकरांसाठी पुण्यात आले होते. शेवटी मोहोळ यांनी धंगेकरांचा लाखभर मतांनी पराभव केला. मोहोळ पुण्याचे खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले. पण त्यांना आता मंत्रीपदाचीही संधी मिळणार आहे.