मुरबाडमध्ये कथोरे विरुद्ध पवार थेट लढत! पवार वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार?

राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर सुभाष पवार यांनी विजय आपलाच होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
ठाणे:

मुरबाड विधानसभेत आता भाजपाचे किसन कथोरे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुभाष पवार अशी थेट लढत होणार आहे. सुभाष पवार यांचे वडील माजी आमदार गोटीराम पवार यांचा किसन कथोरे यांनी 2009 आणि 2014 अशा दोन विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव केला होता. त्यानंतर गोटीराम पवार यांना राजकीय संन्यास घ्यावा लागला होता. त्यामुळे आता त्यांचे पुत्र सुभाष पवार हे वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशा स्थितीत मुरबाड विधानसभेची निवडणूक एकतर्फी न होता चुरशीची होणार हे निश्चित आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुभाष पवार हे शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुरबाडची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रह धरला होता. मात्र भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत मुरबाडमधून विद्यमान आमदार किसन कथोरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे सुभाष पवार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तुतारी हाती घेतली. 

ट्रेंडिंग बातमी - महाविकास आघाडीत वाद असलेले 'हे' आहेत 'ते' मतदार संघ

त्यामुळे आता मुरबाड विधानसभेत पुन्हा एकदा कथोरे विरुद्ध पवार हा संघर्ष पाहायला मिळणार आहे. यापूर्वी सुभाष पवार यांचे वडील माजी आमदार गोटीराम पवार हे मुरबाड विधानसभेतून चार वेळा आमदार राहिले आहेत. मात्र आमदार किसन कथोरे यांनी 2009 आणि 2014 अशा सलग दोन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव केला. त्यानंतर गोटीराम पवार हे सक्रीय राजकारणापासून दुर गेले. त्यामुळे आता वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी सुभाष पवार यांना चालून आली आहे.

ट्रेंडिंग बातमी - उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपात धुसफूस, सांगलीत बंडखोरी होणार?

त्यासाठीच त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करत कथोरे यांना आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर  सुभाष पवार यांनी विजय आपलाच होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर किसन कथोरे हे पुन्हा एकदा विजय मिळवण्यासाठी कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत किसन कथोरे यांनी भाजप उमेदवार कपिल पाटील यांना मदत केली नव्हती असा आरोप करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही कथोरे यांना उमेदवारी मिळाली आहे. अशा वेळी पक्षांतर्गत विरोधकांना रोखण्याचे आव्हानही कथोरे यांच्या समोर असणार आहे.   
 

Advertisement