Sajjad Nomani Video : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत व्होट जिहाद (Vote Jihad) हा मुद्दा चांगलाच तापला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या पराभवात मुस्लीम समाजानं ठरवून एकगठ्ठा मतदान हा महत्त्वाचा फॅक्टर होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. या मतदानालाच त्यांनी 'व्होट जिहाद' हे नाव दिलंय. या व्होट जिहादाला आता व्होट धर्मयुद्धानं उत्तर द्या असं आवाहनही फडणवीसांनी मुंबईतील शिवाजी पार्कमधील सभेत केलं आहे.
महाविकास आघाडीकडून मात्र फडणवीसांचा दावा सातत्यानं फेटाळला जात आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या 269 उमेदवारांना जाहीर करणाऱ्या सज्जाद नोमानी यांचा एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नोमानी हे मुस्लिम वक्फ बोर्डाचे प्रवक्ते आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे व्हिडिओ?
मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांच्या सोशल मीडिया नेटवर्कवरुन (X) हा व्हिडिओ शेअर केलाय. 'एक ऐसा व्होट जिहाद करो' असं सांगत शेलार यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये नोमानी यांनी महाराष्ट्रात त्यांचा पराभव झाला तर दिल्ली सरकारही फार काळ टिकणार नाही. आमचं लक्ष्य फक्त महाराष्ट्र सरकार नाही. तर दिल्लीतील सरकार आहे, असं सांगताना दिसत आहेत.
नोमानी यांनी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांच्यासोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला होता. पण, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जरांगे यांनी घुमजाव केलं. त्यानंतर मुस्लीम-मराठा-दलित आघाडी तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. त्यानंतर त्यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाची भूमिका जाहीर केली.
नोमानी यांनी महाविकास आघाडीला 269 जागांवर पाठिंबा जाहीर केलाय. त्याचबरोबर चित बहुजन आघाडी, एमआयएमसह अपक्ष उमेदवारांना उर्वरित मतदारसंघात पाठिंबा दिला आहे.
( नक्की वाचा : Vote Jihad ला व्होट धर्मयुद्धानं उत्तर द्या, PM मोदींच्या उपस्थितीमध्ये फडणवीसांचं आवाहन )
कोण आहेत नोमानी?
सज्जाद नोमानी हे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आहेत. ते इस्लामसंदर्भात भाषणेही देत असतात. अनेकदा नोमानी हे आपली राजकीय भूमिका ठळकपणे मांडताना दिसतात. नोमानी यांनी रामायणासंदर्भात बोलत असताना बुरख्याचे महत्त्व सांगताना रामायणाचा संदर्भ सांगत ते पटवून देण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे बराच वाद झाला होता. नोमानी यांनी म्हटले होते की भारतामध्ये मुलींना हिजाब घालण्यापासून रोखले जाते. संपूर्ण जगाला हिजाब घालणे हे भारतानेच शिकवले असल्याचे त्यांचे म्हणणे होते.