Nandurbar News : नंदुरबारमध्ये शिंदे गट विरुद्ध भाजप! निवडणुकीनंतर राडा; आजी-माजी आमदारातील वाद चिघळला  

माजी आमदार शिरीष चौधरी यांचे कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री अनिल पाटील यांनी पत्रकार परिषद अनेक धक्कादायक आरोप केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी

Nandurbar News : नंदुरबार पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी माजी आमदार शिंदे गटाचे नेते शिरीष चौधरी यांचा सुपुत्र प्रथमेश चौधरी यांची उपनगराध्यक्ष पदी निवडीनंतर काढण्यात आलेल्या विजय मिरवणुकीत झालेल्या राड्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिरीष चौधरी यांचे कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री अनिल पाटील यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर गंभीर आरोप करत नंदुरबारमधील घटनेचा तीव्र निषेध केला आहे. नंदुरबारमध्ये जी गुंडशाही सुरू आहे, ती आता आम्ही उघड्या डोळ्यांनी बघणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

माजी मंत्री अनिल पाटील यांचे धक्कादायक आरोप...

माजी आमदार शिरीष चौधरी यांचे कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री अनिल पाटील यांनी पत्रकार परिषद अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. शिरीष चौधरी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीच्या नावाखाली दहशत निर्माण केली. मिरवणुकीत अंगप्रदर्शन करणे, चिथावणीखोर हावभाव करणे आणि भरवस्तीत जाऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला तसेच महिलांना जातीवाचक शिवीगाळ करणे, हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. एका तरुणाला कपडे काढून मारहाण करण्यात आली, ज्याचे व्हिडिओ पुरावे समोर आले आहेत. पाटील म्हणाले की, विजय मिळाल्यावर गुलाल उधळायचा असतो. पण येथे सत्तेचा माज दाखवून सर्वसामान्यांना धमकावले जात आहे. चौधरी कुटुंबाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर बोट ठेवत त्यांनी सांगितलं की, गुजरातमध्ये बनावट दारू विक्री आणि खंडणीसारख्या गुन्ह्यांत हे कुटुंब गुंतलेले आहे. ही दडपशाही मोडून काढण्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांची भेट घेणार असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत. 

नक्की वाचा - PMC Election 2026: वसंत मोरेंचे फेसबुकवर लाखो फॉलोअर्स, पण मतं फक्त 666? बातमी Viral, ट्रोलिंग जोरात! सत्य काय?
अमळनेर आणि नंदुरबारच्या जनतेने या दहशतवादाला न घाबरता पोलिसांकडे तक्रारी कराव्यात, प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. आगामी विधानसभा अधिवेशनात या गुंडगिरीचा जाब गृहमंत्री यांना विचारणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. अनिल पाटील यांच्या या टीकेनंतर या दोघांमध्ये आता आणखी वाद वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून यावर आता माजी आमदार शिरीष चौधरी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Topics mentioned in this article