सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडत आहे. या मतदार संघात नारायण राणें विरूद्ध विनायक राऊत यांच्यात थेट लढत होत आहे. इथली लढत ही राणे आणि ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे दोन्ही बाजून जोरदार प्रचार केला जात आहे. शिवाय आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी बडेनेते रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात येत आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही सभा शुक्रवारी 3 मे रोजी कणकवलीत होत आहे. याची जोरदार तयारी शिवसेनेने केले आहे. शिवाय या सभेच्या माध्यमातून ठाकरे मोठं शक्तप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. अशा वेळी भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी ठाकरेंच्या सभेपूर्वी वातावरण तापवलं आहे. त्यांनी ठाकरे यांना थेट धमकी दिली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात राणे विरूद्ध शिवसेना यांच्यात राडा होण्याची दाट शक्यता आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राणेंची धमकी काय?
उद्धव ठाकरे यांची सभा राणेंच्या बालेकिल्ल्यात होत आहे. त्याआधीच राणे यांनी ठाकरेंना थेट इशारा दिला आहे. सभे वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर बोलला तर सहन करणार नाही. उगाच तोंड उघडायचं नाही. काही झालं तरी तुमचा जाण्याचाच रस्ता बंद करून टाकीन, अजिबात सोडणार नाही. पोलिसांनी याची आताच काळजी घ्यावी असा इशारा राणे यांनी दिला आहे. त्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे. ठाकरे यांनी आपल्या आतापर्यंत झालेल्या सभांमध्ये मोदी आणि शहा यांना लक्ष केले आहे. त्यामुळे कणकवलीच्या सभेत ठाकरे नक्की कोणाला फैलावर घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - ठाण्याचा उमेदवार कोण? आज घोषणा होणार? तीन नावे चर्चेत
'पराभवाची हॅट्रीक करण्यासाठी राणे मैदानात'
दरम्यान राणे यांच्या या धमकीचा समाचार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी घेतला आहे. राणे यांचा जनाधार कधीच संपला आहे. त्यामुळेच त्यांना राज्यसभेवर जावे लागले. आता ते पराभवाची हॅट्रीक करण्यासाठी पुन्हा उभे आहेत, असा टोलाही त्यांनी लागावला. मालवण, मुंबईतल्या पराभवानंतर आता लोकसभेतही त्यांचा पराभव होईल असेही त्यांनी सांगितले. अब की बार नारायण राणे पराभूत होणार अशी घोषणाही त्यांनी दिली आहे. राणेशाही संपली आहे. सामंतशाही येऊ पाहात होती. पण राणेंना त्याला विरोधक केला. त्यामुळेच राणेंना पुन्हा उमेदवारी मिळाली असेही पारकर म्हणाले. दरम्यान नियती न्याय करणार असे सांगत विनायक राऊत केंद्रात मंत्री होती असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंची कणकवलीत सभा
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शुक्रवार 3 मे रोजी सायंकाळी 6 वाजता कणकवली येथे सभा होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानावर ही सभा होईल. या सभेला कणकवली विधानसभा आणि कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील 5 तालुक्यातील इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली आहे.