जाहिरात
Story ProgressBack

ठाण्याचा उमेदवार कोण? आज घोषणा होणार? तीन नावे चर्चेत

Read Time: 2 min
ठाण्याचा उमेदवार कोण? आज घोषणा होणार? तीन नावे चर्चेत
ठाणे:

महायुतीत ठाणे कोणाचे हे अजुनही निश्चित झालेले नाही. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. मात्र तसे असतानाही या जागेबाबत निर्णय झालेला नाही. ही जागा भाजला मिळावी असा आग्रह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. तर दुसरीकडे या जागेवर शिंदे गटाने दावा केला असून उमेदवारीची घोषणा आज ( मंगळवार ) होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाकडून तीन जणांची नावे चर्चेत आहेत. यापैकी एकाचे नाव निश्चित केले जाईल.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

ती तीन नावे कोणाची? 

ठाणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास शिवसेना शिंदे गटाकडून तीघे जण इच्छुक आहेत. त्यामध्ये सर्वात आघाडीवर आमदार प्रताप सरनाईक यांचे नाव आहे. सरनाईक यांनी कागदपत्रांची जुळवाजुळवही केली आहे. तर दुसरं नाव पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचे आहे. म्हस्के यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. म्हस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. तिसरं नाव हे  मिनाक्षी शिंदे यांचे आहे. त्यामुळे या तिघां पैकी एकाच्या नावावर शिकामोहर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. शिंदेंसाठी ठाण्याची जागा प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे ही जागा भाजपला सोडण्याच्या मनस्थितीत शिंदे नाहीत. 

हेही वाचा -  भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारफेरीवर दगडफेक, गोवंडी येथील घटना

ठाण्यावर भाजपचाही दावा 

ठाण्याची जागा भाजपला मिळावी यासाठी स्थानिक कार्यकर्तेहे आग्रही आहे. ही जागा मुळची भाजपचीच होती असा त्यांचा दावा आहे. शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वता ही जागा मिळावी यासाठी प्रयत्नशिल होते. गणेश नाईक यांचे चिरंजीव आणि माजी खासदार संजीव नाईक इथून भाजपच्या तिकीटावर लढण्यास इच्छुक आहेत. ते मतदार संघातही चांगलेच एॅक्टीव्ह झाले आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत ही जागा मिळावी यासाठी भाजपचा प्रयत्न असणार आहे. 

महाविकास आघाडीचा उमेदवार मैदानात 

महायुतीकडून ही जागा कोणाची याचा घोळ सुरूच आहे. असे असताना महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. ही जागा आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला गेली आहे. ठाकरे गटाने विद्यमान खासदार राजन विचारे यांना मैदानात उतरवले आहेत. विचारे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. अशा वेळी महायुतीच्या गोटात मात्र जागा कोणाला याचीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे प्रचारात आघाडीच्या उमेदवाराने मात्र मुसंडी मारली आहे. 

डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination