किशोर बेलसरे, प्रतिनिधी
नाशिक लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार? याबाबत महायुतीचा निर्णय अद्याप झालेला नाही. अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतरही हा तिढा कायम आहे. त्यातच आता एक नवा ट्विस्ट आल्यानं महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे. नाशिकमधून शांतिगीरी महाराजांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय. शांतीगिरी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यापूर्वी भेट घेतली होती. ते शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत, असं मानलं होतं. पण, त्यांनी आता अपक्ष म्हणून अर्ज भरल्यानं महायुतीच्या अडचणतील वाढ झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहेत शांतीगिरी महाराज ?
सोमेश शांतिगिरी महाराज हे श्री जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी आहेत. त्यांना मानणारा मोठा समाज नाशिक जिल्ह्यात आहे. त्याच आधारावर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. देव, देश आणि धर्मासाठी निवडणूक लढवण्याचा संकल्प त्यांनी यापूर्वीच जाहीर केला आहे. त्यांनी यापूर्वी एखाद्या पक्षाची उमेदवारी मिळणार का? याची चाचपणी देखील केली होती. पण, तसं न झाल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय.
आपल्या प्रचारासाठी अनेक साधू-संत नाशिकमध्ये येणार असल्याचं शांतीगिरी महाराजांनी यापूर्वीच जाहीर केलंय. हिंदुत्वाला मानणारा मतदार त्यांच्या बाजूनं सरकला तर महायुतीची अडचण वाढू शकते. नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत. गेल्या 10 वर्षांपासून खासदार असलेले गोडसे यंदा पुन्हा एकदा ही जागा लढवण्यासाठी इच्छूक आहेत.
( नक्की वाचा : भुजबळांनी माघार घेताच गोडसे अॅक्शन मोडमध्ये, उमेदवारीबद्दल म्हणाले.... )
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचीही नाशिकसाठी चर्चा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्या नावासाठी आग्रही होते, असा दावा भुजबळांनी केला होता. नाशिक मतदारसंघात भाजपाचे 3 आमदार आहेत. त्यामुळे ही जागा लढवण्यासाठी भाजपाही आग्रही आहे.