राहूल वाघ, प्रतिनिधी
Nashik News : नाशिक महापालिका निवडणुकीत प्रचाराचा सूर आता हिंसक आणि वादग्रस्त वळणावर पोहोचला आहे. तिकीट न मिळाल्याच्या नाराजीतून उमेदवारांमधील संघर्ष थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. कुठे कार्यकर्त्यांना मारहाण, तर कुठे फोटो मॉर्फ करून बदनामी, तर कुठे प्रचाराला बोलवून रोजंदारी न दिल्याने हाणामारी आणि सोशल मीडियातून सुरू असलेल्या या वॉरमुळे कायदा-सुव्यवस्थेचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. यासंदर्भात विविध पोलीस स्टेशनमध्ये चार गुन्हे दाखल झाले आहेत.
उमेदवारीवरून सुरू झालेला वाद आता हिंसक वळणावर
महापालिका निवडणुकीत भाजपकडून तिकीट न मिळाल्याची धुसफूस अजूनही शमलेली नाही. प्रभाग २९ मध्ये दीपक बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यात उमेदवारीवरून सुरू झालेला वाद आता हिंसक वळणावर पोहोचला आहे. मतदारांच्या स्लिप वाटत असताना दीपक बडगुजर यांच्या प्रचारातील कार्यकर्ता हर्षद थोरात याच्यावर दोन अज्ञातांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. शिवीगाळ, मारहाण करत मतदारांचा डेटा असलेली वही फाडण्यात आली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. दुसरीकडे, मुकेश शहाणे यांनी आपले आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे.
प्रभाग १३ मध्ये माजी महापौर विनायक पांडे यांचा फोटो मॉर्फ करून बदनामी केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. सभा, रॅलीपुरते न थांबता आता सोशल मीडियातूनही एकमेकांवर चिखलफेक सुरू असल्याने पोलिसांसमोर ‘स्ट्रीट क्राईम'सोबतच ‘सोशल मीडिया वॉर' रोखण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.