महायुतीमधील जागा वाटपामध्ये नवाब मलिकांचं काय होणार? याची सर्वांनाच उत्सुकता होती. अंडरवर्ल्डशी संबंध असल्यामुळे नवाब मलिक यांना तुरुंगात जावं लागलं होतं. ते जामिनावर बाहेर आले आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले. अजित पवारांच्या पक्षातील त्यांच्या सहभागावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर नाराजी व्यक्त करणारं पत्र लिहिलं होतं.
नवाब मलिक हे अजित पवारांच्या पक्षाचा मुंबईतील मुस्लीम चेहरा होते. त्यामुळे त्यांना शिवाजीनगर-मानखुर्द तर त्यांची मुलगी सना मलिक यांना अणूशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्याची पक्षाची योजना होती. सना मलिक यांना त्याप्रमाणे उमेदवारी मिळाली. तर नवाब मलिक यांना भाजपाचा विरोध कायम आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सना मलिक यांनी भरला अर्ज
सना मलिक यांनी त्यांचे वडील नवाब मलिक यांच्यासोबत अणूशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरला. हा अर्ज भरल्यानंतर 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांना भाजपाकडून होत असलेल्या विरोधाबाबत उत्तर दिलं आहे.
'मी ही निवडणूक जिंकणार हा मला पूर्ण विश्वास आहे. मी गेल्या पाच वर्षात जनतेसाठी भरपूर कामं केला आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांची मुलगी अशी ओळख असण्यापेक्षा माझी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे,' असं त्यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : काँग्रेसला राज्यात मोठा धक्का, माजी मंत्र्यानं केली बंडखोरी, वंचितकडून निवडणूक लढवणार )
माझ्या वडिलांनी आणि मी केलेल्या कामांवर माझा विश्वास आहे. भाजपाकडून जो विरोध होतोय त्यावर मी फारसे बोलणार नाही. माझ्या वडिलांची केस कोर्टात सुरू आहे त्यामुळे कोर्टातच दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल.
आज जरी माझ्याबरोबर शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते नसले तरी देखील अनुशक्ती नगरमधून मोठ्या प्रमाणात जनता माझ्या पाठीशी होती. याच जनतेच्या जीवावर मी भव्य रॅली काढली. मी विजयाची रॅली देखील काढेल, असं त्यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे मित्रपक्षाला सुनावलं.
सना मलिक यांना अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यांचं आव्हान आहे. फहाद यांनी आयत्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. ते अणूशक्तीनगरमधील स्थानिक देखील नाहीत. त्यामुळे मला त्यांचं विशेष आव्हान वाटत नाही, असं सना मलिक यांनी यावेळी सांगितलं.