राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 40 जणांचा समावेश आहे. स्टार प्रचारकांमध्ये शरद पवारांसोबत सुप्रिया सुळे यांचं ही नाव आहे. राज्यातील नेत्यांबरोबरच इतर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचाही या स्ट्रार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूकीत प्रचाराची जबाबदारी या नेत्यांवर असणार आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीत कोण कोण?
राष्ट्रवादीनं जाहीर केलेल्या यादीत शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, एकनाथ खडसे या नेत्यांचा समावेश आहे. शिवाय पी. सी चाको, सोनिया दुहान, जितेंद्र आव्हाड, वंदना चव्हाण, राजेश टोपे यांचाही या यादीत समावेश आहे.
राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं आता पर्यंत आपल्या पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूर अमोल कोल्हे, अहमदनगर निलेश लंके, वर्धा अमर काळे, तर भास्कर भगरे यांना दिंडोरीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कोणत्या पक्षात कोण कोण स्टार प्रचारक?
भाजपनंही महाराष्ट्रासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बानवकुळे, पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. शिवेसना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,गुलाबराव पाटील, मिलींद देवरा यांचा समावेश आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांचा समावेश आहे. तर ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव हे स्टार प्रचारक असतील. तर नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरत हे काँग्रेसचे स्टार प्रचारक असतील.