बिहारमध्ये एनडीएचं जागा वाटप फिक्स, चिराग पासवानकडे 5 जागा, जेडीयूला किती?

जाहिरात
Read Time: 2 mins
दिल्ली:

उत्तर प्रदेश, महाराष्ट्रानंतर भाजपसाठी महत्वाच्या असणाऱ्या बिहारमधलं (Bihar Seat Sharing) जागा वाटप निश्चित झालं आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) 40 जागा आहेत. त्यापैकी नितीशकुमार यांचा जेडीयू (JDU) हा 16 जागा लढवणार आहे तर भाजपा (Bihar BJP) 17 जागा लढण्याची शक्यता आहे. चिराग पासवान यांना हाजीपूरच्या जागेसह 5 जागा मिळणार आहेत. बिहारमध्ये जागेचा पेच हा भाजप आणि जेडीयूमध्ये नव्हताच. पेच होता ते चिराग पासवान, त्यांचा चुलता आणि इतर छोट्या पक्षांना मिळणाऱ्या जागांवर. त्या सर्वांचं समाधान करण्यात भाजपला यश आल्याचं दिसतं आहे. जागा वाटप निश्चित झालं असलं तरीसुद्धा तशी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि चिराग पासवान यांच्यात दिल्लीत एक बैठक पार पडली आणि त्यानंतर चिराग पासवान यांनी ट्विट करत जागा वाटप निश्चित झाल्याचं सांगितलं.

Advertisement

चिराग पासवान यांचा पेच काय होता?
चिराग पासवान हे राम विलास पासवान यांचे सुपूत्र आहेत. पण मधल्या काळात त्यांच्या लोकजनशक्ती पार्टीमध्ये फुट पडली. साल होतं 2021. त्यांचे चुलते पशुपती पारस यांनी बंड केलं. ते एनडीएचे भाग झाले. हाजीपूर ही रामविलास पासवान यांची पारंपारीक सीट आहे. तिथून पशुपती पारस खासदार झाले. एनडीएसोबतच्या जागा वाटपात चिराग पासवान यांनी हाजीपूरच्या जागेवर दावा केला. पण ती जागा सोडायला पशुपती पारस तयार नव्हते. शेवटी त्यावरही तोडगा काढला गेल्याची माहिती आहे. पशुपती पारस यांना एकही लोकसभेची जागा न सोडता त्यांना राज्यपालपदाची ऑफर भाजपनं दिल्याचं कळतं आहे. त्यांचा मुलगा प्रिंस राज हा समस्तीपूरचा आमदार आहे. त्याला बिहारमध्ये मंत्री केलं जाणार आहे. शेवटी एनडीएचं जे जागा वाटप झालेलं आहे त्यानुसार रामविलास पासवान यांचा उत्तराधिकारी म्हणून चिराग पासवान यांच्यावरच शिक्कामोर्तब झालेलं दिसतं आहे.    

Advertisement

लहान पक्षांना किती जागा?
बिहारमध्ये 2019 ला जे जागा वाटप होतं ते जवळपास तसच ठेवण्यात आलेलं आहे. भाजपा- 17, जेडीयू-16 तर एलजेपी- 5 एचएएमला 1 सीट, उपेंद्र कुशवाहच्या RLM ला 1 सीट सोडण्यात आली आहे. 2019 साली भाजपनं 17 जागा जिंकलेल्या होत्या तर जेडीयूने 16, रामविलास पासवान यांच्या लोजपाने 6. आगामी लोकसभा निवडणूकीतही भाजपला जर अब की बार 400 पार वास्तवात उतरवायचं असेल तर बिहारमध्ये मागच्या वेळेसची कामगिरी पुन्हा बजावावी लागेल.

Advertisement
Topics mentioned in this article