NDTV Marathi Exclusive : विधानसभा निवडणुकीचा प्रचारातच नाही तर गेल्या काही वर्षातील राज्याच्या राजकारणात दोन नेत्यांना मोठं महत्त्व आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे ते दोन नेते आहेत. राज्याच्या राजकारणातील वेगवेगळ्या मुद्यांवर हे दोन नेते वारंवार आमने-सामने आले आहेत. सध्याची विधानसभा निवडणूक देखील त्याला अपवाद नाही.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत शरद पवार यांनी 'NDTV मराठी' ला Exclusive मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पवारांनी राज्यातील सर्व विषयांवर मनमोकळी आणि सविस्तर उत्तरं दिली आहे. शरद पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पवारांनी फडणवीसांना प्रशस्तीपत्रक दिलं.
( नक्की वाचा : शरद पवारांनी जाहीर केली मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका, उद्धव ठाकरेंचे टेन्शन का वाढले? )
माझा देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक रोष नाही. त्यांचे वडील गंगाधर माझे चांगले मित्र होते, त्यावेळी देवेंद्र लहान होते. पण माझ्या त्यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या. माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली, काही गोष्टी त्यांनी चांगल्या केल्या, हे माझं वैयक्तिक मत आहे. त्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्यामध्ये... मी सगळ्यांबद्दल बोलत नाही, स्वच्छ प्रशासन देण्याची इच्छा होती. अशी जनतेत भावना होती, ती चुकीची नाही. आता ज्यांना ते प्रोत्साहित करतात त्यांच्याबद्दल मी बोललेलो नाही, असं पवारांनी आवर्जुन स्पष्ट केलं.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का?
सुप्रिया सुळे यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळणार का ? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. मुख्यमंत्री पदासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी म्हटले की, सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच आहे मात्र सुप्रिया यांना देशाच्या राजकारणात अधिक रस आहे.