सूरत, इंदूरपाठोपाठ आणखी एका ठिकाणी काँग्रेसला धक्का बसलाय. ओडिशामधील पुरीमधील काँग्रेस उमेदवार सुचारिता मोहंती (Congress Candidate Sucharita Mohanty) यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडं पैसे नाहीत. त्याचबरोबर पक्षानंही फंड दिला नाही, त्यामुळे अर्ज मागे घेत असल्याचं मोहंती यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी पक्षानं कमकुवत उमेदवारांना तिकीट दिल्याचा आरोपही त्यांनी केला. सुचारिता मोहंती पुरीमध्ये भाजपा उमेदवार संबिता पात्रा विरोधात निवडणूक रिंगणात होत्या.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'मी अशी निवडणूक लढवू शकत नाही'
पूरीमधील काँग्रेस उमेदवार सुचारिता मोहंती यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, 'मी अर्ज मागे घेताय. कारण, पक्ष मला फंड देऊ शकत नाही. दुसरं कारण म्हणजे येथील 7 विधानसभा मतदारसंघातील काही मतदारसंघामध्ये निवडणूक जिंकू शकतील अशा उमेदवारांना तिकीट दिलेलं नाही. अनेक कमकुवत उमेदवारांना तिकीट दिलंय. या पद्धतीनं मी निवडणूक लढवू शकत नाही.'
मोहंती यांनी निवडणूक लढवण्यास नकार देत काँग्रेस सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांना पत्र लिहलं आहे. यापूर्वी गुजरातमधील सूरत आणि मध्य प्रदेशातील इंदूरमधून काँग्रेस उमेदवारानं निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यानंतर पुरीमध्येही तोच प्रकार घडलाय. ओडिशामध्ये लोकसभेसह विधानसभा निवडणूकही होत आहे. राज्यात सत्तारुढ बिजू जनता दल, भाजपा आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत आहे.