सुनील कांबळे, प्रतिनिधी
बीड लोकसभा मतदारसंघाची लढत यंदा चांगलीच चुरशीची झाली. या निवडणुकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे 6553 मतांनी पराभूत झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनावणे यांनी पंकजांना पराभूत केलं. पंकजांच्या या पराभवाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पराभूत झाल्यानं लातूरच्या तरुणानं जीव दिला आहे. सचिन मुंडे असं या तरुणाचं नाव आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फेसबुक पोस्टमधून दिले होते संकेत
सचिन अहमदपूर तालुक्यातील येस्तार गावाचा रहिवासी होता. त्यानं पंकजा मुंडे निवडून आल्या नाहीत तर मी राहत नाही, अशी फेसबुकवर पोस्ट टाकली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर गेल्या तीन चार दिवसांपासून तो नैराश्यात होता. त्यानं शुक्रवारी रात्री बस खाली उडी मारुन आपलं आयुष्य संपवलं.
बीड लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार याची उत्सुकता शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती. प्रत्येक फेरीनंतर विजयाचं पारडं विरुद्ध बाजूला झुकत होतं. बीड लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामधील गेवराई, बीड, केज या ठिकाणी महाविकास आघडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मताधिक्य मिळाले तर परळी,माजलगाव,आष्टी या गावात महायुतीच्या पंकजा मुंडे यांना आघाडी मिळाली. या 6 पैकी 5 ठिकाणी सध्या महायुतीचे आमदार आहेत. तर फक्त बीड विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडं आहे.
( नक्की वाचा : पराभूत होऊनही मोदींनी थोपटली पंकजा मुंडेंची पाठ, दिल्लीत नेमकं काय झालं?)
भिवंडीतही दुर्दैवी प्रकार
भिवंडी लोकसभा मतदारसंघातही असाच दुर्दैवी प्रकार घडला आहे. भिवंडी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार कपिल पाटील पराभूत झाले. त्यांचा पराभव जिव्हारी लागल्यानं संजय पाटील या शहापूरच्या कार्यकर्त्यानं आत्महत्या केली. संजय हा कपिल पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता होता. त्यानं या निवडणुकीतही जोरदार प्रचार केला. कपिल पाटिलच विजयी होतील अशी पैज देखील त्यानं अनेकांशी लावली होती. पण, प्रत्यक्षात उलटं घडल्यानं संजयनं गळफास घेऊन जीव दिल्याची माहिती आहे.
संजयच्या पश्चात त्याची पत्नी, दोन मुली आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे. या घटनेवर कपिल पाटील यांनी दुःख व्यक्त केलं. त्यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण जबाबदारी कपिल पाटील फौंडेशनची असेल, अशी घोषणा पाटील यांनी केलीय.