स्वानंद पाटील, प्रतिनिधी
बीड लोकसभा निवडणूक (Beed Lok Sabha Elections Result) यंदा चांगलीच अटीतटीची झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनावणे (Bajarang Sonawane) यांनी अवघ्या 6,553 मतांनी पराभव केला. संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या या लढतीची दखल नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील घेतली आहे.
नवी दिल्लीमध्ये एनडीए संसदीय पक्षाच्या नेतेपदी मोदी यांची निवड झाली. या बैठकीला पंकजा मुंडे देखील उपस्थित होता. यावेळी भाजपा आणि एनडीएतील अनेक नेत्यांनी पंकजा यांची वाखणणी केली. नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी पंकजा पुढं आल्या त्यावेळी मोदींनी आशिर्वाद देत त्यांची पाठ थोपटली.
अटीतटची लढत
बीड लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार याची उत्सुकता शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती. प्रत्येक फेरीनंतर विजयाचं पारडं विरुद्ध बाजूला झुकत होतं. बीड जिल्ह्यात असलेल्या 6 विधानसभा मतदारसंघात गेवराई, बीड, केज या ठिकाणी महाविकास आघडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मताधिक्य मिळाले तर परळी,माजलगाव,आष्टी या गावात महायुतीच्या पंकजा मुंडे यांना आघाडी मिळाली. विशेष म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 5 ठिकाणी सध्या महायुतीचे आमदार आहेत. तर फक्त बीड विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडं आहे.
( नक्की वाचा : महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत? )
यापूर्वी 2019 साली झालेल्या परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा यांचा पराभव झाला होता. त्या निवडणुकीत पंकजा यांचा पराभव करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे या लोकसभा निवडणुकीत पंकजांसोबत होते. धनंजय मुंडे यांनी या पराभवानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती.
बीड मध्ये आमचा निसटता पराभव झाला, तो मान्य! जनतेने दिलेला कौल स्वीकारून पुढे जाऊ. स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब व स्व.पंडित अण्णा यांनी आम्हाला जनसेवेचे बाळकडू दिलेले आहे. जय-पराजय होत राहतील, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कायम तत्पर आहोत व पुढेही राहू! पंकजाताईच्या या लढाईत 6 लाख 77 हजार पेक्षा अधिक मतदानरुपी आशीर्वाद दिलेल्या माय बाप जनतेचे तसेच अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, मान्यवर नेत्यांचे तसेच सर्व जिवलग सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार...! असं धनंजय यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : रावसाहेब दानवेंच्या पराभवाचं खरं कारण काय? 'या' कारणामुळे हुकली सिक्सरची संधी )
धनंजय मुंडे यांनी यावेळी सुरेश भट यांच्या गाजलेल्या ओळींचा आधार घेत कार्यकर्त्यांना दिलासा दिला. एका विजयाने हुरळून किंवा एका पराभवाने नाउमेद व्हायचे नसते.
उष:काल होता होता, काळरात्र झाली; अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली! असं सांगत मुंडे यांनी विजयी उमेदवार बजरंग सोनावणे यांचं अभिनंदन केलंय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world