'परंडा मतदारसंघात पैशांची ढगफुटी होणार' ठाकरेंचे खासदार असं का म्हणाले?

मतदार संघामध्ये आरोपांचा धुरळा उडायला सुरूवात झाली आहे. धाराशीवच्या परंडा मतदार संघात त्याची झलक पाहायला मिळत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
धाराशीव:

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. उमेदवारांनी अर्जही दाखल केले आहेत. त्यामुळे कोणत्या मतदार संघात साधारण पणे कोणामध्ये लढत असणार याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यात काही बंडखोरही मैदानात आहेत. त्यांनी उमेदवारी मागे घेतली तर चित्र आणखी स्पष्ट होईल. त्यासाठी 4 नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे. मात्र मतदार संघामध्ये आरोपांचा धुरळा उडायला सुरूवात झाली आहे. धाराशीवच्या परंडा मतदार संघात त्याची झलक पाहायला मिळत आहे. या मतदार संघात शिंदे शिवसेनेकडून आरोग्य मंत्री तानाजी सांवत मैदानात आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून रणजीत पाटील निवडणूक लढत आहेत. मात्र या निवडणुकीच्या मैदानात रंग भरला आहे तो खासदार ओमराजे निंबळकर यांनी. त्यांनी सध्या तानाजी सावंत यांना लक्ष्य केलं आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

परंडा विधानसभा मतदार संघातून तानाजी सावंत हे शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्री करण्यात आलं नव्हते. त्यामुळे सावंत हे नाराज होते. पुढे शिवसेनेत फुट पडली. त्यावेळी तानाजी सावंत यांनी ठाकरें ऐवजी शिंदेंना साथ दिली. महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यात तानाजी सावंत यांना आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. आता होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी तानाजी सावंत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने रणजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचाराची जबाबदारी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'आबांचे केस खूप लहान होते, त्यामुळे ते केसाने गळा कापू शकत नाहीत' संजय राऊत

खासदार ओमराजे आणि तानाजी सावंत यांच्यातील संबध सर्वश्रुत आहेत. लोकसभा निवडणुकीला ही या दोघांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले होते. त्यावेळी ओमराजे लोकसभेच्या मैदानात होते. आता तानाजी सावंत विधानसभेच्या मैदानात आहेत. त्यामुळे ओमराजे यांनी तानाजी सावंत यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. आम्ही  पैशाचे लालची असतो, तर 50 कोटी घेऊन तेव्हात तिकडे गेलो असतो. पण सत्तेवर आणि 50 खोक्यांवर लाथ मारून आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर इमानदारीने उभे आहोत. असा टोला त्यांनी यावेळी तानाजी सावंत यांचे नाव न घेता लगावला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  मुनगंटीवारांचा खंदा कार्यकर्ता ढसाढसा रडला, कारण काय?

विधानसभा निवडणुकीत आता पैशाचा पाऊस नाही तर पैशाची ढगफुटी होणार आहे. मात्र आपल्याला मशालीलाच मतदान करायचे आहे. पहिले आपली निशाणी धनुष्य बाण होती. ती चोरली गेली आहे. आता आपली निशाणी मशाल आहे. त्यामुळे प्रत्येकाने मशालीचे बटण दाबायचे आहे असेही त्यांनी सांगितले. कोणी कितीही पैसा ओतला तरी ठाकरें बरोबर प्रामाणिक राहायचे आहे असेही ओमराजे म्हणाले. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी आधी स्वत:कडे पाहावे असा सल्लाही या निमित्ताने ओमराजे यांनी तानाजी सावंत यांना दिला. 

Advertisement