स्वानंद पाटील, प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुका काही दिवसांवर असतानाच आता प्रचारालाही वेग आलेला दिसत आहे. परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी मला आमदार केलं तर सर्व मुलांचं लग्न लावून देतो, असं आश्वासन दिलं होतं. देशमुखांच्या या आश्वासनावर त्यांचे प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. त्यांनी देशमुख यांच्यावर टीका करत असताना नाव न घेता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मुंडे?
परळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाषण करत असताना धनंजय मुंडे यांनी राजेसाहेब देशमुख यांच्या वक्तव्यावर टीका केली. राजेसाहेब देशमुख यापूर्वी काँग्रेस पक्षात होते. त्या पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी अद्याप अविवाहित आहेत, हा धागा पकडत मुंडे यांनी देशमुख यांच्या वक्तव्याला उत्तर दिलं.
काल कुठंतरी भाषण झालं, म्हणाले सगळ्या मुलांचं लग्न लावून देऊ. ही निवडणूक लग्नासाठी चाललीय का? ते ज्या पक्षात होते तिकडून इकडं आले आहेत त्यांच्या पक्षाचे जे राष्ट्रीय नेते होते त्यांनी आणखी लग्न झालं नाही. ते आता इकडं येऊन सर्वांचं लग्न लावून देणार असं म्हणतायत. हे निवडणुकांचे मुद्दे आहेत याचा विचार करा. या पद्धतीनं फक्त वाद निर्माण होतील, विकास होणार नाही, असं मुंडे यावेळी म्हणाले.
मागच्यावेळी मतदान करताना तुम्ही मला मंत्री म्हणून नाही तर आमदार होण्यासाठी मतदान केलं होतं., पण तुमच्या मतामध्ये शक्ती होती त्यामुळे मी मंत्री झालो. कोव्हिडच्या काळातील संकटात मी तुमच्यासोबत होतो. मी तुमच्या सुख दु:खात सहभागी होतो. मी तुमच्या विकासासाठी कमी पडलो असेल तर मत द्यायचं की नाही याचा विचार करा, मी तुमची मान खाली घातली असेल तर मतदान करायचं की नाही याचा विचार करा. फक्त कोण कुठल्या जातीचा आहे याचा विचार करुन मतदान करायचं असेल तर माफ करा, हे पुढच्या पिढीसाठी चांगलं नाही, असं आवाहन मुंडे यांनी केलं.
( नक्की वाचा : लाल संविधान दाखवून कुणाला इशारा देताय? देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना प्रश्न )
देशमुख यांचं आश्वासन काय?
राजेसाहेब देशमुख यांनी प्रचारादरम्यान घाटनांदुर येथे बोलताना आमदार झालो तर अविवाहित तरुणांचं लग्न लावून देण्याचं आश्वासन दिलं होतं. परळी परिसरात तरुण पोराला नातेवाईक म्हणून येत असतांना विचारतात नोकरी आहे का? काही कामधंदा आहे का? पालकमंत्र्यांनाच येथे काही उद्योगधंदा नाही, तुम्हाला कुठून येणार? एकही उद्योगधंदा उभा केला नाही, त्यामुळे मुलांचे लग्न होणे मुश्कील झाले आहे. पण सर्व पोरांना मी या ठिकाणी आश्वासन देतो जर उद्याच्या काळात मी आमदार झालो सगळ्या पोराचे लग्न करु, सगळ्या पोरांना कामधंदा देऊ, अतिशय जोरदार पद्धतीने या ठिकाणी तरुण बाबुराव तुमचं लग्न करायचंय त्यामुळे आगे बढो म्हणल्याशिवाय पर्याय नाही,' असे राजेसाहेब देशमुख म्हणाले. देशमुख यांच्या या आश्वासनाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.