सुरज कसबे, प्रतिनिधी
Pimpri Chinchwad News : निवडणूक अर्ज छाननीमध्ये तांत्रिक कारणास्तव अपक्ष ठरवण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार जयश्री भोंडवे यांना अखेर पक्षाचं अधिकृत घड्याळ चिन्ह मिळालं आहे. एबी फॉर्म वेळेत सादर करूनही तो गहाळ झाल्याने निर्माण झालेला पेच उच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपानंतर सुटला आहे.
आधी अपक्ष म्हणून उमेदवारी, आता मोठा दिलासा
पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार जयश्री भोंडवे यांनी प्रभाग क्रमांक 16 मामुर्डी, किवळे, रावेतमधून ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला) जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज आणि पक्षाचा एबी फॉर्म वेळेत सादर केला होता. मात्र, प्रशासकीय स्तरावर हा फॉर्म गहाळ झाल्याने अर्ज छाननीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून घोषित केले. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
अखेर जयश्री भोंडवे यांना घड्याळ चिन्ह बहाल...
आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी भोंडवे यांनी तातडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी अर्ज सादर करतानाचे सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओग्राफी आणि इतर तांत्रिक पुरावे न्यायालयात सादर केले. या पुराव्यांमध्ये तथ्य असल्याचं पाहून न्यायालयाने निवडणूक आयोगाला या प्रकरणाची तातडीने स्वतंत्र सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार, पालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी चिन्ह वाटपाच्या दिवशीच तातडीची सुनावणी घेतली. सर्व पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर भोंडवे यांनी विहित मुदतीतच एबी फॉर्म जमा केल्याचं सिद्ध झालं. आयुक्तांनी हा फॉर्म ग्राह्य धरत छाननीतील त्रुटी सुधारण्याचे आदेश दिले होते. या निर्णयामुळे चिन्ह वाटपाच्या अंतिम यादीत जयश्री भोंडवे यांचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून करण्यात आला आणि त्यांना घड्याळ चिन्ह बहाल करण्यात आले. या नाट्यमय घडामोडींमुळे भोंडवे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.