PM मोदी कन्याकुमारीत दाखल होताच 33 वर्षांपूर्वीचा फोटो का होतोय Viral?

PM Modi : सोशल मीडियावर पंतप्रधानांचा 33 वर्ष जुना फोटो वेगानं व्हायरल होत आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM  Narendra Modi) प्रदीर्घ निवडणूक प्रचारानंतर कन्याकुमारीत दाखल झाले आहेत. ते कन्याकुमारी 2 दिवस ध्यान करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आलीय. कन्याकुमारीत सुरक्षेचीही खास व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर पंतप्रधानांचा 33 वर्ष जुना फोटो वेगानं व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोचा इतिहास आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे इतिहास?

पंतप्रधान मोदींचा व्हायरल होत असलेला हा फोटो 11 डिसेंबर 1991 या दिवशी एकता यात्रेमधला आहे. ही यात्रा कन्याकुमारीमधील प्रतिष्ठित विवेकानंद रॉक मेमोरियलपासून सुरु झाली होती. काश्मीरमध्ये या यात्रेची सांगता झाली. 

व्हायरल फोटोमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी दिसतायत. दोन्ही नेते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहेत. एकता यात्रा डिसेंबर 1991 मध्ये कन्याकुमारीपासून सुरु झाली. 26 जानेवारी 1992 रोजी श्रीनगरमध्ये तिरंगा झेंडा फडकवल्यानंतर समाप्त झाली. 

एकता यात्रेचं नेतृत्व अनुभवी भाजपा नेते मुरली मनोहर जोशी यांनी केलं होतं. नरेंद्र मोदी तेव्हा भाजपाचे सामान्य कार्यकर्ते होते. त्यांनी या यात्रेच्या आयोजनात मुख्य भूमिका बजावली होती. दहशतवादी शक्तींच्या विरोधात भारत मजबुतीनं आणि एकजूट उभा आहे, हे जगाला दाखवण्याचा या यात्रेचा उद्देश होता. 14 राज्यातून या यात्रेचा प्रवास झाला. राष्ट्रीय एकतेचा संदेश या यात्रेतून देण्यात आला. 

Advertisement

( नक्की वाचा : 'देश वाचवण्याची शेवटची संधी....' PM मोदींचं नाव घेत मनमोहन सिंग यांचं भावनिक आवाहन )

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपलाय. हा प्रचार संपताच पंतप्रधान मोदींची कन्याकुमारी यात्रा आणि विवेकानंद रॉक मेमोरियलमधील ध्यान मंडपममध्ये ध्यान धारणा सुरु झाली आहे. त्याचवेळी 33 वर्ष जुना हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमाची माहिती होताच काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी राजकारण सुरु केलंय. काँग्रेसनं तर या मुद्यावर निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे.