PM Modi: विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी (5 ऑक्टोबर) जवळपास संपूर्ण दिवस महाराष्ट्रात होते. शनिवारी त्यांच्या हस्ते आरे ते बीकेसी या मेट्रो लाइन-3 च्या एका टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांनी बंजारा विरासत संग्रहालयाचेही उद्घाटन केले. पंतप्रधान मोदी हे ठाण्यात येणार असून ते ठाणे रिंग मेट्रोच्या कामाचा नारळ वाढवणार आहेत. यानंतर ते बीकेसी इथे नव्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडणार आहे. भाजपने या निवडणुकीमध्ये हल्ले-प्रतिहल्ले करताना विकासाचा मुद्दाही जोरकसपणे मांडण्याचे ठरवले आहे.
महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागले
2014 साली युतीचे सरकार पुन्हा महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पडली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी विकासकामांचा आढावा घेत रेंगाळलेले प्रकल्प मार्गी लावणे आणि नवे प्रकल्प मांडत ते सुरू करण्यावर भर दिला होता. हे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा ट्रान्स-हार्बर लिंक हा प्रकल्प अनेक वर्ष प्रस्तावित होता. आवश्यक असलेल्या सगळ्या परवानगी मिळवत हा प्रकल्प मार्गी लावण्यात आला. कोरोना काळात हा प्रकल्प रेंगाळला होता. महायुतीची सत्ता आल्यानंतर फडणवीसांनी हा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते.
समृद्धी महामार्ग हा ड्रीम प्रोजेक्टही जवळपास पूर्ण झाला असून या प्रकल्पाचा अखेरचा टप्पा लवकरच पूर्ण होऊन संपूर्ण मार्ग या वर्षाच्या अखेरीसपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. कोस्टल रोडच्या वाटेतले कायदेशीर अडथळे दूर करत हा मार्ग वेगाने पूर्ण करण्यात आला. काही महिन्यांपूर्वी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या कामाला सुरुवात झाली आहे. मुंबई शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवत नवे प्रकल्प सुरू करणे आणि सुरू झालेले प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. हे उद्दीष्ट्य पूर्ण करण्यासाठी आणि निर्णय प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी एक वॉर रूम उभारण्याचा फडणवीसांनी निर्णय घेतला होता. यामुळे निर्णय़ प्रक्रियेला आणि अंमलबजावणीला अधिक गती मिळणे शक्य झाले होते. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे विविध विकासकामांची यादी सादर करत याचाही प्रचारामध्ये वापर करण्याची दाट शक्यता आहे.