पुण्यात भाजपाचाच कारभारी, धंगेकरांना धोबीपछाड देत मोहोळ विजयाचे मानकरी

Pune Lok Sabha Result 2024 : राज्यातील प्रतिष्ठेचा पुणे लोकसभा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यात भाजपाला यश मिळालंय.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत 'कसबा पॅटर्न' ची पुनरावृत्ती होईल, अशी काँग्रेसला आशा होती.
पुणे:

Pune Lok Sabha Result 2024 :  राज्यातील प्रतिष्ठेचा पुणे लोकसभा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यात भाजपाला यश मिळालंय. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत भाजपाच्या मोहोळ यांनी बाजी मारलीय. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार मोहोळ यांनी धंगेकरांवर 1,18,878 मतांची विजयी आघाडी घेतली आहे. मोहोळ यांना 5,62,544 रवींद्र धंगेकरांना 4,43,666 मतं मिळाली. वंचितचे वसंत मोरे फारशी कमाल करु शकले नाहीत. त्यांना फक्त 31,346 मतं पडली आहेत.

( नक्की वाचा : बारामती शरद पवारांचीच! संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी )
 

कसबा पॅटर्नची पुनरावृत्ती नाही

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला होता. कसबा हा भाजपाचा बालेकिल्ला होता. या बालेकिल्ल्याला धंगेकर यांनी खिंडार पाडलं होतं. धंगेकर पुणे लोकसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती करतील अशी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या समर्थकांना आशा होती. पण, त्यांची ही अपेक्षा पूर्ण झाली नाही. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचा 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला.

पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची देखील मतं आहेत.मनसेनं लोकसभा निवडणूक न लढता महायुतीला पाठिंबा दिलाय. पण, मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत होते. सोशल मीडियावर जोरदार सक्रीय असलेल्या वसंत मोरे यांना मानणारा वर्ग पुणे शहरात आहे. वसंत मोरे कुणाचा खेळ बिघडवणार याची सर्वांना उत्सुकता होती. पण, मोरे यांना ही अपेक्षापूर्ती करण्यात अपयश आलं.

Advertisement

( नक्की वाचा : वडिलांच्या अपयशाची लेकीकडून परतफेड, पक्षाचा बालेकिल्ला परत मिळवला )

पुणे लोकसभा मतदारसंघात  शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती,पुणे कॅन्टॉन्मेंट आणि कसबा पेठ असे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती आणि पुणे कॅन्टॉन्मेंट या चार मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा तर कसबा पेठेतमध्ये स्वत: रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. हे पक्षीय बलाबल पाहात पुण्यात मोहोळ सहज विजयी होतील असं मानलं जात होतं. मतमोजणीनंतरही तेच सिद्ध झालंय. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर तसंच मुंबईतील दोन मतदारसंघ गमावल्यानंतरही पुणे कायम ठेवण्यात भाजपाला यश मिळालंय.