- बारामती विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक अजित पवारांच्या निधनानंतर 23 तारखेला होणार आहे
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांना जवळपास सर्व पक्षांचा पाठिंबा असून त्यांनी प्रचार सभा घेतली आहे
- शरद पवार बारामतीत मतदानासाठी येऊ शकत नसल्याचे त्यांनी प्रकृती खराबीमुळे स्पष्ट केले आहे
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार या मैदानात आहेत. त्यांनी जवळपास सर्वच पक्षांचा पाठिंबा आहे. बारामतीत 23 तारखेला मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांची सांगता सभा बारामतीत झाली. या सभेला सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. पण शरद पवारांची अनुपस्थितीत यावेळी जाणवली. सभा झाल्यानंतर शरद पवारांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी आपण बारामतीत मतदानासाठी येऊ शकणार नाही असं सांगितलं आहे. त्यामागचं कारण ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र त्यांनी सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचं आवाहन बारामतीकरांना केला आहे.
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की मी 1967 साली लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला आहे. आता 2026 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले.
पुढे पवार म्हणतात, डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो. माझ्यावर अथक प्रेम व विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजुन घेतील याची मी खात्री बाळगतो. आमच्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार) या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहिर केला आहे.
स्व. अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व.अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी. बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे. ते या आवाहनास प्रतिसाद देतील, असा मला विश्वास आहे. मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणूक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला व विचारणा केली. परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचे राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अखेर अतिशय व्यथित व जड अंत:करणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागला. या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावे, असे मी बारामतीकरांना पुन्हा एकदा आवाहन करतो.धन्यवाद ! असे आवाहन पवारांनी केले.