- उन्हाळ्यात कडक उष्णता आणि मद्यपानामुळे शरीर वेगाने निर्जलीकरण होऊन गंभीर आजार उद्भवू शकतात
- मद्यपानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन उष्माघाताचा धोका वाढतो आणि तापमान नियंत्रण कमजोर होते
- मद्यपानामुळे हृदयावर ताण येतो, रक्तदाब वाढतो आणि पचनसंस्थेवर तसेच यकृतावर अतिरिक्त ताण येऊ शकतो
उन्हाळ्याचा कडाका वाढत असताना शरीराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. कडक ऊन आणि वाढता उकाडा यामुळे शरीरावर आधीच ताण असतो. अशा परिस्थितीत मद्यपान करणे आरोग्यासाठी अधिक आव्हानात्मक आणि धोकादायक ठरू शकते. उष्णता आणि अल्कोहोल या दोन्ही गोष्टींमुळे शरीर वेगाने निर्जलीकृत (Dehydration) होते. ज्यामुळे गंभीर आजार उद्भवू शकतात. उन्हाळ्याच्या तीव्र लाटेत मद्यपान करणे हे केवळ व्यसन नसून आरोग्यासाठी एक गंभीर जोखीम ठरत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोल आणि उष्णता यांचे समीकरण शरीराची नैसर्गिक यंत्रणा कोलमडून टाकू शकते. अल्कोहोलमधील घटकांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वेगाने कमी होते, ज्याला वैद्यकीय भाषेत 'डिहायड्रेशन' म्हणतात. यामुळे उष्माघाताचा धोका अनेक पटींनी वाढतो.
अल्कोहोल हे निसर्गातः 'डाय्युरेटिक' आहे, म्हणजेच यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. उन्हाळ्यात घामावाटे आधीच शरीरातील पाणी कमी होत असते. त्यात मद्यपानामुळे उरलेले पाणीही बाहेर फेकले जाते. यामुळे चक्कर येणे, डोकेदुखी आणि गंभीर प्रकरणांमध्ये 'हीट स्ट्रोक' (उष्माघात) होण्याचा धोका असतो. अल्कोहोलमुळे शरीराची तापमान नियंत्रण करण्याची क्षमता मंदावते, परिणामी उन्हात मद्यपान केल्यास शरीराचे तापमान अचानक वाढू शकते.
जास्त उष्णता आणि अल्कोहोलचे मिश्रण हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम करते. यामुळे रक्तदाब वाढून हृदयावर ताण येतो. तसेच, उन्हाळ्यात पचनसंस्था संवेदनशील असल्याने दारूमुळे पोटात जळजळ, उलट्या किंवा यकृतावर (Liver) अतिरिक्त ताण येण्याची शक्यता असते. मद्यप्राशनानंतर हँगओव्हर घालवण्यासाठी ॲसिटामिनोफेन सारखी औषधे घेणे टाळावे, कारण यामुळे यकृताला कायमस्वरूपी इजा होऊ शकते.
सुरक्षित राहण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
- 1. पाण्याचे प्रमाण: दारूच्या प्रत्येक ग्लाससोबत किमान 1 ग्लास पाणी आवर्जून प्या.
- 2. रिकाम्या पोटी पिणे टाळा: मद्यपानापूर्वी पौष्टिक आहार घ्यावा, जेणेकरून अल्कोहोल रक्तात वेगाने शोषले जाणार नाही.
- 3. सावलीत राहा: थेट उन्हात बसून मद्यपान करणे टाळा; शक्यतो थंड जागी बसा.
- 4. खाद्यपदार्थांची निवड: खारट चिप्स किंवा शेंगदाणे खाणे टाळा, कारण यामुळे तहान वाढते. त्याऐवजी काकडी किंवा ताजी फळे उत्तम ठरतात.
- 5. मर्यादा पाळा: उन्हाळ्यात शरीराची सहनशक्ती कमी होते, त्यामुळे नेहमीपेक्षा कमी प्रमाणात मद्यपान करणे हिताचे ठरते.
तज्ज्ञांनी सुचवल्यानुसार, जर मद्यपान करायचेच असेल तर शरीरातील जलपातळी राखणे अनिवार्य आहे. मद्यपानासोबत पाणी आणि फळांचा वापर वाढवणे आवश्यक आहे. तसेच, रिकाम्या पोटी मद्यपान करणे यकृतासाठी घातक ठरू शकते. विशेषतः दुपारी उन्हात बसून मद्यपान करणे थेट जीवाला धोका निर्माण करू शकते. मद्यपान हे घातकच आहे. त्यामुळे मद्यपान करणे टाळा. मग ते उन्हाळ्यात असे की हिवाळ्यात. जर तुम्हाला फिट राहायचे असेल तर मद्यपान करू नका असा सल्ला तज्त्ज्ञ देतात. त्यामुळे मद्याचा मोह टाळा. त्या ऐवजी फळांचा रस पिण्याला प्राधान्य द्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world