MNS Gudi Padwa Rally : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे... आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात ते बोलत होते. राज ठाकरे यांनी यावेळी मनसे कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश दिला. राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा देताच त्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची आभार मानले.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत त्यांचे आभार मांडले आहेत.
दिल्ली दौऱ्यावर स्पष्टीकरण
राज ठाकरे यांनी या भाषणात दिल्ली दौऱ्यावर झालेल्या टिकेलाही उत्तर दिलं. 'मी जो विरोध केला तो काही भूमिका पटल्या नाहीत म्हणून विरोध केला. मग उद्धव ठाकरे , संजय राऊतांना इतक्याच मोदींच्या भूमिका पटत नव्हत्या तर राजीनामे खिशात न ठेवता माझ्याबरोबर मैदानात का नाही उतरलात?' असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.'
' मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून विरोध केला नाही. मला भूमिका पटली नाही म्हणून विरोध केला,' असं राज ठाकरे यांनी या सभेत स्पष्ट केलं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली होती. त्या मुद्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय.
'काहीजणांना राजकीय इतिहासाचं माहित नसतो. बाळासाहेब ठाकरे 1980 साली दिल्लीत संजय गांधी आणि इंदिरा गांधी ह्यांना भेटायला गेले होते. नेत्यांना भेटणं, चर्चा करणं... ह्यात वावगं काय ?'
चिन्ह बदलणार नाही!
तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका... मी जे अपत्य जन्माला घातलं आहे 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' तेच मी वाढवणार... मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. असे विचार माझ्या डोक्याला शिवतही नाहीत. असं सांगत शिवसेनाचा प्रमुख होण्याच्या चर्चेला राज ठाकरे यांनी पूर्णविराम दिलाय.
अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
राज ठाकरेंचं भाषण लाईव्ह पाहा
राज ठाकरेंची भाषणाच्या सुरुवातीलाच निवडणूक आयोगावर टीका केली. 'आरोग्यसेवकांनी रुग्णांची सेवा करत रहावी. तुम्हाला निवडणुकीच्या कामात कोण जुंपतं हेच मी पाहतो, असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला.