कट्टर विरोधक एकाच मंचावर, रामदास कदम -वैभव खेडेकर समोरा समोर आले, तेव्हा काय घडलं?

Advertisement
Read Time3 min
कट्टर विरोधक एकाच मंचावर, रामदास कदम -वैभव खेडेकर समोरा समोर आले, तेव्हा काय घडलं?
खेड:

शिवसेना नेते रामदास कदम आणि मनसे नेते वैभव खेडेकर यांच्यातलं वैर संपुर्ण कोकणाला माहित आहे. त्यांचं नातं असं आहे की त्यांच्या मधून विस्तवही जात नाही. पण आता स्थिती काहीशी बदलली आहे. या कट्टर वैऱ्यांना महायुती म्हणून एकत्र यावं लागलं आहे. त्याला नाईलाज म्हणायचा की मनोमिल या प्रश्न खरा कोकणवासीयांना पडला आहे. खेडमध्ये महायुतीची सुनिल तटकरेंसाठी सभा झाली. या सभेत एकाच व्यासपिठावर कदम आणि खेडेकर दिसले. आधी खेडेकर व्यासपिठावर होते. त्यानंतर रामदास कदम यांची एन्ट्री झाली. त्यावेळी कदम आणि खेडेकर समोरा समोर आले. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

खेडेकरांची नाराजी दूर? 

महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरेंचा प्रचार करण्यास वैभव खेडेकर यांनी विरोध केला होता. शिवाय महायुतीत सहभागा विषयीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी महायुतीच्या प्रत्येक सभेला जाणंही टळलं होतं. रायगड लोकसभेच्या होणाऱ्या सभांकडे पाठ फिरवत होते. तर रत्नागिरीत हजेरी लावत होते. ज्यांच्या विरोधात लढलो त्यांचाच प्रचार कसा करायचा असा सवाल खेडेकरांचा होता. त्यामुळे ते प्रचारात दिसले नाहीत. पण खेड इथे झालेल्या महायुतीच्या प्रचार सभेत खेडेकर थेट मंचावर दिसले. खेडेकर आधीपासूनच मंचावर होते. त्यानंतर रामदास कदम यांची एन्ट्री झाली. खडेकर कदमांकडे पाहात होते. कदमांचे खेडेकरांकडे लक्ष गेले. त्यांनीही पुढे  होऊन त्यांना हस्तांदोलन केले. पण दोघांनी शेजारी शेजारी बसणं टाळलं. कदम आणि खेडेकर एकाच मंचावर दिसल्याने या दोघांचे खरोखर मनोमिलन झाले का अशी चर्चा खेडमध्ये रंगली होती.   

हेही वाचा - बारामती कोणाची? पवारांचा अभेद्य गड पवारच भेदणार?

वैभव खेडेकरांची नाराजी का?

वैभव खेडेकर यांनी खेड दापोलीमध्ये सतत रामदास कदम यांच्या बरोबर संघर्ष केला आहे. त्यांच्या विरोधात निवडणूक ही लढली आहे. यामुळे कदम यांच्या बरोबर जुळवून घेण्यास खेडेकरांचा विरोध होता. शिवाय आगामी विधानसभेची तयारीही खेडेकर करत आहेत. त्यामुळे जर कदम यांच्याशी जुळवून घेतलं तर भविष्यात विधानसभेलाही त्यांचेच काम करावे लागेल. त्यामुळे राजकीय अस्तित्वावरच गदा येईल याची कल्पना त्यांना आहे. त्यामुळेच त्यांनी आपली नाराजी राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानंतरही ते खेडच्या सभेत कदमां बरोबर एकाच मंचावर दिसले. 

रायगडमध्ये तटकरे विरुद्ध गिते 

रायगड लोकसभेत लढाई ही सुनिल तटकरे आणि अनंत गिते यांच्यात आहे. मनसेने तटकरेंना पाठिंबा दिला आहे. पण मनसे त्यांचे काम किती 'मनसे' करत आहे हे गुलदस्त्यात आहे. शिवाय मनसे ही मुळची शिवसेनेचीच विचारांची संघटना आहे. त्यामुळे बाळासाहेबांना आणि उद्धव ठाकरेंना साथ द्या असं आवाहन या आधीच भास्कर जाधव यांनी केले आहे. याचा कितपत मनसैनिकांवर परिणाम होतो हेही तितकेच महत्वाचे आहे. तर गिते हे तटकरेंचा काही करून पराभव करायचा या विचाराने पेटले आहेत.