विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. त्यानंतर इच्छुकांनी बेडुक उड्या मारायला सुरूवात झाल्या. मोठ्या नेत्यांची चलती होती.एका पक्षातून दुसऱ्या पक्षात ते जात आहेत. पक्षप्रवेध धडाक्यात होत आहेत. एकीकडे बडे नेते पक्ष बदलताना दिसत आहेत. अशा वेळी काही छोटे नेतेही या वाहत्या गंगेत हात धुवून घेताना दिसत आहेत. अशीच घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदार संघात घडली आहे. इथे एका उपसरपंचाने एक नाही तर चार पक्ष बदलले आहे. ते ही दोन दिवसात. त्यामुळे त्यांच्या या पक्षा प्रवेशाची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभेची निवडणूक जाहीर झाली अन् या पक्षातून त्या पक्षात नेत्यांसह कार्यकर्ते उड्या मारू लागले आहेत.उड्या मारायला हवे मात्र त्याला ही काही सीमा असतात असं बोललं जातं. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील एका उपसरपंचाने सर्व सीमांचे उल्लंघन केले आहे. त्याने चक्क दोन दिवसात चार पक्ष प्रवेश केल्याचा महापराक्रम स्वतःचा नावावर नोंदवला आहे. त्यामुळे या उपसरपंचाची निवडणुकी पेक्षा जास्त चर्चा रंगली आहे. प्रत्येक मतदार, छोटा मोठा नेता या निवडणुकीत महत्वाचा समजला जात आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या गटात सरपंच असतील किंवा उपसरपंच असतील यांना खेचण्याचा प्रयत्न होत आहे.
ट्रेंडिंग बातमी - राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?
रामलू राठोड असं या उपसरपंचाचे नाव आहे. ते राजूरा तालुक्यातल्या सुब्बईचे उपसरपंच आहेत. आधी ते काँग्रेसमध्ये गेले. तिथल्या पक्ष प्रवेशावेळी घातलेल्या फुलांची माळ सुकत नाही तोच त्यांना शेतकरी संघटनेचा झेंडा हाती घेतला. पण हा झेंडा बाजूला सारून त्यांनी पुन्हा काँग्रेसचा हात पकडला. बरं आता तरी ते थांबतील असं वाटत असतानाच त्यांनी काँग्रेसचा हात पुन्हा एकदा अलगद सोडला आणि भाजपचं कमळ हाती घेतलं. बरं हे त्यांनी अगदी दोन दिवसात करून दाखवलं. त्यांच्या बरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांनीही पक्ष प्रवेश केले. त्यामुले गेले दोन दिवस ते पक्ष प्रवेशात बिझी होते.
राजुरा विधानसभा मतदार संघात सुब्बई ग्रामपंचायत येते. इथे राठोड हे उपसरपंच आहेत. रामलू राठोड हे मूळचे काँग्रेस पक्षाचे आहेत. ते काँग्रेसचेच उपसरपंच अशी त्यांची ओळख आहे. चार दिवसापूर्वी राजुरा येथील शेतकरी संघटनेचे कार्यालय उघडण्यात आले. तिथे राठोड यांनी जावून शेतकरी संघटनेत प्रवेश केला. प्रवेशाची बातमी माध्यमातून पुढे आली. असं झालं कसं म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांनी धावत पळत राठोड यांचे घर गाठले. त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. काँग्रेस प्रवेशाची ही बातमी प्रसिद्ध झाली. पण परत राठोड यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा शेतकरी संघटनेचे कार्यालय गाठून संघटनेत प्रवेश केला. त्याच दिवशी भाजपचे काही नेते सुब्बई गावात गेले. तेव्हा भाजप नेत्यांचा हस्ते राठोड यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे दोन दिवसात चार पक्षात प्रवेश करण्याचा विक्रमच राठोड यांनी केला.