जालना लोकसभेत सध्या भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मतदार संघ त्यांनी पिंजून काढला आहे. प्रत्येक गावात जाऊन प्रचार करण्यावर त्यांनी भर दिला आहे. मात्र गोलापांगरी या गावात दानवे प्रचारासाठी गेले असता त्यांना मराठा आंदोलकांना सामोरे जावं लागलं. आंदोलकांनी प्रचारासाठी आलेल्या दानवेंना घेराव घातला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जालन्यातील गोलापांगरी येथे रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची प्रचारसभा होती. या प्रचार सभेदरम्यान मराठा आंदोलकांनी दानवे यांना निवेदन स्वीकारण्याची विनंती केली होती. दानवेंनीही आक्रमक मराठा आंदोलकांची ही विनंती मान्य केली. दानवे व्यासपीठावरून खाली उतरले. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला. एक मराठा लाख मराठा अशा जोरजोरात घोषणाही दिल्या. दानवे यांनी यावेळी आंदोलकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी दिलेले निवेदन ही स्विकारले. तसेच त्यांची मनधरणी करण्यात यश ही मिळवलं. पुन्हा तुमची भेट घेऊन चर्चा करेन असे आश्वासनही दानवे यांनी दिले. त्यानंतर आंदोलकांनी दानवे यांना घातलेला घेराव मागे घेतला.
हेही वाचा - 'विश्वजीत कदम वाघच,संधी बघून वाघ झडप घालतो'
जालना जिल्ह्यातूनच मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा आंदोलनाचे लोण संपुर्ण राज्यात पसरले होते. त्यामुळे या भागात मराठा आंदोलक हे आक्रमक आहेत. शिवाय त्यांना नेत्यांनाही गावबंदी जाहीर केली आहे. याचा फटका नेत्यांनाही बसला आहे. जालना लोकसभा मतदार संघात भाजपकडून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे मैदानात आहेत. तर काँग्रेसने डॉ. कल्याण काळे यांना संधी दिली आहे. कल्याण काळे यांचेही मतदार संघात चांगले प्रस्थ आहे. भाजपचा गड असलेल्या या मतदार संघात काळे यांनी या आधी दानवे यांना कडवी टक्कर दिली होती. त्यात त्यांचा केवळ आठ हजार मतांनी पराभव झाला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी काळे जोरदार तयारी करता आहे.