Raj Thackeray Kankavli Speech : रत्नागिरी सिंधुदर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये सभा घेतली. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच महायुतीच्या स्टेजवर आले होते. राज ठाकरेंच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे पाहूया
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
1. मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात पाठिंबा जाहीर केला त्यावेळी कुठं सभा घ्याव्या लागतील हे फारसं मनात नव्हतं. पण, नारायणरावांचा फोन आल्यावर मी त्यांना नाही म्हणून शकत नाही. मी संबंध सांभाळणारा माणूस आहे. खरंतर नारायरणरावांना या प्रचारसभेची, माझी आवश्यकता नाही. ते निवडून आले आहेत.
2. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील जनता सुजाण आहे. महाराष्ट्र राज्याला 9 भारतरत्न आहेत. त्यापैकी जवळपास 7 भारतरत्न हे कोकणातील आहेत. त्यापैकी 4 भारतरत्न हे एकट्या दापोलीतील आहेत. त्यामुळे हा सुजाण मतदारसंघ आहे. मी पाठिंबा का दिला हे गुढीपाडव्याच्या सभेत सांगितलं होतं.
3. मी सरळ चालणारा आहे. मला एखादी गोष्ट पटली तर पटली. एखादी गोष्ट नाही पटली तर शेवटपर्यंत नाही पटणार. 2014 ते 2019 च्या दरम्यान ज्या गोष्टी मोदी सरकारकडून झाल्या. त्यामधील काही गोष्टी नाही पटल्या. त्या गोष्टी मी स्क्रीनवर दाखवून त्याचा निषेध केला. त्याबाबत आपण मोकळं राहणं आवश्यक आहे. नोटबंदी, पुतळ्याची गोष्ट नाही पटल्या. पण, ज्या पटल्या त्याचं जाहीर कौतुक करणारा मी माणूस आहे.
( नक्की वाचा : रत्नागिरी-सिंधुदुर्ग : मुलाच्या पराभवाचा वचपा नारायण राणे काढणार? )
4. कोण कुठला बाबर आणि त्याला सांभळणाऱ्या आमच्या अवलादी हे 1988-89 किंवा त्याच्या आधीपासून सुरु असेल. आता नरेंद्र मोदी सरकार असताना कोर्टाकडून त्याची परवानगी मिळाली. त्याचा पहिला टप्पा राम मंदिर उभं राहिलं. मी निश्चित सांगतो नरेंद्र मोदी सरकार आणि त्या काळातील सर्वोच्च न्यायालय यामुळे राममंदिर उभं राहिलं आणि त्या कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली.
5. या देशात उभी फूट पडलीय. एक तर मोदींच्या बाजूला किंवा मोदींच्या विरोधात आहात. 2019 मध्ये मी जे बोललो ते आजच्या विरोधकांमध्ये नाही. मला काहीतरी बदल्यात हवं होतं म्हणून मी विरोध केला नाही. मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला. समजा तेव्हा भारतीय जनता पक्षानं अडीच-अडीच वर्षाचा तुमचा प्रस्ताव मान्य केला असता तर हे बोलला असता का? नसतं बोलला असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
6. 2014 ते 19 या दरम्यान तुम्ही त्यांच्या सत्तेत होता. त्यानंतर अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होतात. महाराष्ट्रातील मागच्या साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत होते. मग कोकणातील उद्योगधंदे का गेले? प्रकल्प आला की तुमचा खासदार विरोध करणार आणि आमदार पाठिंबा देणार असं राज यांनी या सभेत सुनावलं. उद्या स्फोट झाला तर कोकणात किती जण जातील याची चिंता करणाऱ्या भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर मुंबईत आहे हे माहिती नाही. तिथं भाभा ऑटोमिक सेंटर हटवा असं ऐकू येत नाही. पण, कोकणात प्रकल्प येऊ द्यायचा नाही, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
7. पहिल्यांदा प्रकल्प थांबवायचा, जमिनिच्या किंमती वाढवायच्या हे प्रकार सुरु आहेत. कोकण रेल्वे याच कोकणातून झाली. तेव्हा कोकणात दलाल फिरत नव्हते. कोकणात चांगले प्रकल्प यावेत. बाजूचा गोवा पाहा सारं जग तिथं जातं. बाजूच्या गोव्यासारखं जग कोकणात दिसलं तर 20-20 सारखी गर्दी होईल. दोन वेळेसच अन्न देऊ शकत नाही ही कोणती संस्कृती? गोवा आणि केरळ असंस्कृत आहेत का? असा प्रश्न राज यांनी विचारला.
( नक्की वाचा : कट्टर विरोधक एकाच मंचावर, रामदास कदम -वैभव खेडेकर समोरा समोर आले, तेव्हा काय घडलं? )
8. सर्व बाजूनी सुंदर असा प्रदेश आहे. जैवविविधता आहे. हा जगातील इतका सुंदर प्रदेश आहे. नारायण राव इथं फक्त हॉटेल आणा आणि इंग्लिश स्पिकिंग कोर्सेस आणा म्हणजे बाजूच्या गोवा आणि केरळमध्ये कुणी जाणार नाही.
9. नारायण राणेंना मुख्यमंत्री म्हणून फक्त 6 महिने मिळाले. पुढील पाच वर्ष मिळाली असती तर इथं कुणाला प्रचाराला यावंच लागलं नसतं. कामाचा झपाटा आणि सपाटा नारायणरावांकडं आहे. अंतुलेनंतर झपाटून काम करणारे मुख्यमंत्री हे नारायण राणे होते, असं बाळासाहेब मला म्हणायचे.
10. नुसताच बाकड्यावर बसणारा खासदार पाहिजे की मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा खासदार हवाय... उद्या मोदींचं सरकार झाल्यावर नारायण राणे मंत्री होतील, असा विश्वास राज यांनी व्यक्त केला.