जाहिरात
Story ProgressBack

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : मुलाच्या पराभवाचा वचपा नारायण राणे काढणार?

Read Time: 5 min
रत्नागिरी-सिंधुदुर्ग : मुलाच्या पराभवाचा वचपा नारायण राणे काढणार?
Narayan Rane Vinayak Raut नारायण राणे आणि विनायक राऊत या पारंपरिक प्रतिस्पर्धांमध्ये ही लढत होणार आहे.
मुंबई:

Ratnagiri–Sindhudurg Lok Sabha  Election : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा कट्टर विरोधक कोण? असा प्रश्न विचारला तर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचं नाव सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतं. नारायण राणे यांनी 2005 साली उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत शिवसेना सोडली. ते समर्थक आमदारांचा गट घेऊन काँग्रेसमध्ये गेले.आधी काँग्रेस नंतर स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि आता भाजपा असा त्यांचा गेल्या दोन दशकांमधील प्रवास आहे. या सर्व प्रवास उद्धव ठाकरे यांचा विरोध हा त्यांच्या राजकारणाचा मुख्य फोकस राहिलेला आहे.रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणेंची लढत ही विनायक राऊत यांच्याशी असली तरी खरा सामना हा राऊतांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीच आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

10 वर्षांमध्ये चित्र बदललं

नारायण राणे यांनी 2005 साली उद्धव ठाकरे आणि एकसंघ शिवसेनेला अंगावर घेत तेंव्हाच्या मालवण मतदारसंघाची पोटनिवडणूक जिंकली. त्यानंतर 2009 साली रत्नागिरी -सिंधुदूर्ग या तेंव्हा नव्यानं तयार झालेल्या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर मुलगा निलेश राणेला खासदार केलं. 2014 साली राणे काँग्रेसच्या तिकीटावर कुडाळ मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. त्यांचा शिवसेना-भाजपा युतीच्या वैभव नाईक यांनी पराभव केला. आज दहा वर्षांनी हे चित्र बदललंय.

नारायण राणे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवतायत. त्यांच्यापुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विनायक राऊत यांचं आव्हान आहे. विनायक राऊत यांना राणे पूर्वी भाग असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ आहे. नारायण राणेंसोबत त्यांचे दहावर्षांपूर्वीचे विरोधक असलेला भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे. 

(नक्की वाचा : राज ठाकरे यांनी मित्राच्या विजयासाठी कसली कंबर, मनसेची फौज राणेंसाठी मैदानात )

ठरलं होतं तर वेळ का लागला?

देशभरात फेब्रुवारी 2024 मध्ये राज्यसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी मिळाली नाही. त्याचा अर्थ राणे यांना भाजपा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असा लावण्यात आला. भाजपाचं ठरलेलं असतानाही राणें यांची उमेदवारी अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झाली. याचं कारण, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील गुंतागुंतीत आहे.

कसा आहे मतदारसंघ ?

रत्नागिरीतील चिपळूण ते सिंधुदुर्गमधल्या सावंतवाडीपर्यंतच्या मोठ्या भू भागामध्ये हा मतदारसंघ पसरला आहे. भौगोलिक दृष्ट्या मोठ्या असलेल्या या मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर चिपळूण तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी हे सहा मतदारसंघ येतात. 

2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर या सहापैकी 4 जागांवर यापूर्वी एकसंघ शिवसेनेचे आमदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडं एक जागा होती. नारायण राणेंचे पूत्र नितेश राणे (कणवली) हे भाजपाचे आमदार होते. शिवसेनेतील फुटीनंतर उदय सामंत (रत्नागिरी) आणि दीपक केसरकर (सावंतवाडी) हे दोन आमदार शिंदे गटात गेले. तर राजन साळवी (राजापूर) आणि वैभव नाईक ( कुडाळ) हे ठाकरेंसोबत राहिले. चिपळूणचे आमदार शेखर निकम हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे 6 पैकी 4 जागा महायुतीकडं तर 2 जागा महाविकास आघाडीकडं असं सध्याचं समीकरण आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील पक्षीय बलाबल

रत्नागिरीउदय सामंतशिवसेना (एकनाथ शिंदे)
चिपळूणशेखर निकमराष्ट्रवादी काँग्रेस
राजापूरराजन साळवीशिवसेना (उबाठा)
कुडाळवैभव नाईकशिवसेना (उबाठा)
कणकवलीनितेश राणेभाजपा
सावंतवाडीदीपक केसरकरशिवसेना (एकनाथ शिंदे)

सामंतांची दावेदारी राणेंची डोकेदुखी? 

रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे या मतदारसंघातील प्रमुख नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या सामंत यांनी मागील लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांच्या मागे आपली ताकद लावली होती. भाजपा-शिवसेना युतीमध्ये हा मतदारसंघ यापूर्वी सातत्यानं शिवसेनकडं होता.तसंच या मतदारसंघात शिवसेनेचे दोन आमदार होते. कोकणी माणूस आणि धनुष्यबाण यांचं भावनिक नातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले बंधू किरण यांना खासदार करण्याची उदय सामंत यांची जय्यत तयारी या सर्व कारणांमुळे नारायण राणेंसमोरील डोकेदुखी वाढली होती.

महायुतीमधील जागावाटपात अखेर हा मतदारसंघ भाजपाला मिळाला. उदय सामंत नारायण राणेंसोबत आहेत. सामंत आणि राणे यांचं मनोमिलन कितपत झालंय हा या निवणूक निकालातील महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे.   

विनायक राऊत हॅट्ट्रिक करणार ?

निलेश राणे यांनी 2009 साली हिसकावलेला मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे जवळचे सहकारी विनायक राऊत यांना 2014 मध्ये मुंबईतून तळकोकणातील या मतदारसंघात पाठवले. 2014 साली त्यांनी निलेश राणेंचा दीड लाखांच्या फरकानं पराभव केला. या मताधिक्यात त्या निवडणुकीतील मोदी लाट हा महत्त्वाचा फॅक्टर होता. 

मागील लोकसभा निवडणुकीत नारायण राणे काँग्रेसमध्ये नव्हते. नवा पक्ष आणि नवा चिन्ह असूनही निलेश राणे यांनी 2, 79,700 मतं मिळवंत दुसरा क्रमांक गाठला. विनायक राऊत यांच्या मदतीला पुन्हा एकदा मोदींचा करिश्मा आणि एकसंघ शिवसेना तसंच भाजपाची संघटनात्मक शक्ती होती.

शिवसेनेच्या फुटीनंतरही विनायक राऊत उद्धव ठाकरेंसोबतच आहेत. मातोश्रीच्या जवळचे नेते अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांचं बरंचसं काम मुंबईतून चालतं. ते मतदारसंघात फारसे नसतात अशी त्यांच्यावर टीका होते. नारायण राणे यांना थेट लक्ष्य करण्यातही राऊत आघाडीवर असतात.शिवसेनेच्या फुटीनंतर होणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या गेल्या 10 वर्षातील कामाचा आणि उद्धव ठाकरे यांच्या करिश्म्याचा कस लागणार आहे.

या भागातील अनेक मतदार हे कामधंद्यासाठी मुंबईत असतात. ठाकरे घराणे आणि धनुष्यबाण चिन्ह यावर मोठी निष्ठा असलेल्या मतदारांची सहानुभूती राऊंताना मिळाली तर त्यांची हॅट्ट्रिक सोपी होईल.

( नक्की वाचा : साताऱ्यात 25 वर्षांमधील सर्वात मोठा बदल, पण परंपरा कायम राहणार का? )

'येवा कोकण आपलाच आसा' पण.... 

कोकण म्हंटलं की डोळ्यासमोर उभ्या राहणाऱ्या आंबा आणि इतर फळांच्या बागा, समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य आणि महानगराच्या धकाधकीत सर्वात मिस करणारी 'सुकून लाईफ' हे सारं या मतदारसंघात अनुभवता येतं. पर्यटकांनी या खजिन्याचा अनुभव घ्यावा यासाठी 'येवा कोकण आपलाच आसा...' हे घोषवाक्य सर्रास वापरलं जातं. 

 'येवा कोकण आपलाच...' सांगत असताना कोकणी माणसाचं पोटापाण्यासाठी मुंबई आणि इतर भागातील स्थलांतर थांबलेलं नाही. मोठ्या प्रयत्नानं कोकण रेल्वे आली. पण, मुंबई-गोवा महामार्गाचा धुराळा अजूनही उडतोच आहे. बारसू रिफायनरीचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. यांत्रिकीकरणानंतर मासेमारांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर होतोय.

त्याचबरोबर पर्यटन व्यवसायात शेजारच्या गोव्यासह भारतामधील अन्य राज्यांसारखी भरारी कोकणाला घेता आलेली नाही. पर्यटनाच्या माध्यमातून भागाचा विकास आणि स्थानिकांच्या रोजगार निर्मितीमध्ये वाढ हे समीकरण अजूनही प्रभावी रुजलेलं नाही. 'कोकणाचा कॅलिफोर्निया करु'ही घोषणा सातत्यानं दिली जाते. पण प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर संधी मिळत नसल्यानं कॅलिफोर्नियातच अनेक कोकणी माणसं स्थिरावली हे वास्तव आहे.

राणे वचपा काढणार का?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील वर्षानुवर्षांच्या या प्रश्नांची आपल्याकडं उत्तरं आहेत, हे मतदारांच्या मनावर बिंबवण्यात नारायण राणे किती यशस्वी होतात हे महत्त्वाचं आहे. राणे यांनी वयाची सत्तरी ओलांडलीय. गेल्या पाच दशकांच्या राजकारणात 'दादा' अशी त्यांची कोकणातील घरोघरी प्रतिमा आहे. 

नारायण राणे यांना दादा म्हणजेच मोठा भाऊ समजणारा मतदार या मतरासंघात आहे. त्यांच्यासोबत नितेश राणेंचा समर्थक मतदार, भाजपाचा पारंपारिक मतदार आणि या सर्वांच्या जोडीला मोदी फॅक्टरही राणेंच्या सोबत आहे. या सर्वांच्या मदतीनं नारायण राणे ही लोकसभा निवडणूक जिंकून विनायक राऊत यांनी त्यांच्या मुलाचा दोन वेळा केलेल्या पराभवाचा वचपा काढणार का? हा खरा प्रश्न आहे. निवडणूक निकालाच्या दिवशी त्याचीच सर्वांना उत्सुकता असेल.

( नक्की वाचा : साताऱ्यात 25 वर्षांमधील सर्वात मोठा बदल, पण परंपरा कायम राहणार का? )
 

कधी आहे निवडणूक?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होईल. तर 4 जून रोजी निकाल लागेल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination