नाशिक इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी हेलिकॉप्टरने आले होते. त्यावेळी त्यांच्या बरोबर त्यांचे सुरक्षा रक्षकही हेलिकॉप्टरमधून बाहेर आले. त्यावेळी त्यांच्या हातात भारीभक्कम बॅगा दिसल्या होत्या. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप करत मुख्यमंत्री शिंदेंना घेरले होते. मुख्यमंत्री खाऊ घेऊनआले तो क्षण अशा आशयाचे ट्वीट त्यांनी करत एकच खळबळ उडवून दिली होती. शिवाय त्यांनी निवडणूक आयोगालाही आव्हान दिलं होतं. शेवटी आज निवडणूक आयोगाने त्याची दखल घेत या बॅगांची तपासणी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बॅगांमधून काय निघाले?
संजय राऊत यांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी या बॅगांची तपासणी केली. या तपासणीमध्ये कपडे आणि इतर सामान निघाल्याचे समोर आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दोन बॅगा यावेळी तपासण्यात आल्या. नाशिकचे शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे आले होते. त्यावेळी त्यांच्या बरोबर या बॅगा दिसून आल्या होत्या. त्यावेळी शिंदे यांनी राऊत यांच्या आरोपांना उत्तर दिले नव्हते. आता बॅगा तपासल्यानंतर शिंदे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राऊतांचा आरोप काय?
मुख्यमंत्री खाऊ घेऊनआले तो क्षण असे ट्वीट करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचले होते. शिवाय नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पैशाचा पाऊस. दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहात आहेत? असा प्रश्न राऊत यांनी केला होता. यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदीआणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे. असं ट्वीट करत राऊत यांनी खळबळ उडवून दिली होती.