EVM शी जोडलेला होता वायकरांच्या निकटवर्तीयाचा फोन? त्या मोबाइलमुळे खळबळ, दोघांना नोटीस

या प्रकरणात वनराई पोलिसांनी पांडिलकर आणि गुरव यांच्याविरोधात CrPC 41 A अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे रविंद्र वायकर 48 मतांनी विजयी झाले आहेत, त्यांच्या या विजयानंतर वारंवार ते विवादात अडकल्याचं दिसून येत आहे. 

 या प्रकरणातील नव्या अपडेटनुसार मुंबई वनराई पोलिसांनी वायकर यांचे निकटवर्तीय मंगेश पांडिलकर आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी दिनेश गुरव यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.  या प्रकरणात वनराई पोलिसांनी पांडिलकर आणि गुरव यांच्याविरोधात CrPC 41 A अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 15 जून रोजी मुंबई पोलिसांनी रविंद्र वायकर यांचे निकटवर्तीय मंगेश पांडिलकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनेश गुरव हे निवडणूक आयोगाचे एनकोर ऑपरेटर आहेत. त्यांनी या प्रकरणात पांडिलकर यांना मदत केली होती. निवडणूक सेंटरमध्ये मोबाइल फोन घेऊन जाण्यास बंदी असतानाही पांडिलकर गोरेगाव निवडणूक सेंटरमध्ये मोबाइल फोन घेऊन गेले होते. हा मोबाइल ईव्हीएमशी जोडलेला होता, अशीही माहिती वनराई पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. यानंतर पांडिलकर आणि दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, पांडिलकर यांचा मोबाइल फोनमधील डेटाचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आला आहे. यावेळी मोबाइलवरील बोटांच्या ठशांचा तपास केला जात आहे. याशिवाय गोरेगाव निवडणूक सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला जात आहे. यातून परवानगी नसतानाही मोबाइल फोन सेंटरमध्ये कसा गेला याबाबत शोध घेण्यास मदत होईल असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकरणात आणखी कोणा कोणाचा समावेश आहे, याचाही वनराई पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.  

Advertisement
Advertisement

टीव्ही 9 प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मंगेश पांडिलकर यांनी सेंटरमध्ये नेलेला फोन हा ईव्हीएमला जोडलेला होता. या मोबाइलवर आलेल्या ओटीपीने ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात वनराई पोलिसांनी पांडिलकर आणि गुरव यांच्याविरोधात CrPC 41 A अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

Advertisement

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात वायकर विरूद्ध कीर्तिकर
मुंबई उत्तर पश्चिम या जागेवरून महायुतीतून रविंद्र वायकर तर महाविकास आघाडीतून अमोल कीर्तिकर निवडणुकीच्या रिंगणात होते. निकालाच्या दिवशी अमोल कीर्तिकर आघाडीवर होते. मात्र या मतदारसंघात नाट्यमयरित्या उलटफेर झाला आणि वायकर विजयी झाले.