आधी जप्तीची कारवाई, नंतर फडणवीसांची भेट, पाठिंब्याची घोषणा अन् जप्ती रद्द

जाहिरात
Read Time: 3 mins
माढा:

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीची कारवाई नाट्यमयरित्या मागे घेण्यात आली आहे. कर्ज वसूली लवादाने तसा आदेश दिला आहे. शिवाय सील केलेले गोडाऊनही सीलमुक्त करून कारखान्याच्या ताब्यात देण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्य सहकारी बँकेने थकीत कर्ज प्रकरणी साखरेची तीन गोडाऊन सील केली होती. दरम्यान ही कारवाई झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात असलेले कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली होती. त्यानंतर त्यांनी माढा आणि सोलापूरात भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर लगेचच दोन दिवसांनी ही कारवाई थांबवण्यात आली. त्यामुळे राजकीय वर्तुळा याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अभिजीत पाटीलांच्या पाठिंब्यानंतर चक्र फिरली 

शरद पवारांचे खंदे समर्थक म्हणून अभिजीत पाटील यांची ओळख आहे. त्यांनी माढा आणि सोलापूर लोकसभा मतदार संघात आघाडीच्या उमेदवारासाठी जोरदार प्रचार सुरू केला होता. मात्र त्याच वेळी ते चेअरमन असलेल्या  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली. शिवाय साखरेची गोडाऊनही सील करण्यात आली. हा पाटील यांच्यासाठी झटका होता. ही बाब समजल्यानंतर पाटील शरद पवारांच्या भर सभेतून ताडकन निघून गेले होते. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मदतीची मागणी केली. फडणवीसांनीही मग मदतीचे आश्वासन दिले. लगेचच पाटील यांनी फडणवीस आम्हाला मदत करणार असल्याने आम्ही त्यांना लोकसभेला मदत करत आहोत असे जाहीर केले. 

Advertisement

हेही वाचा - श्रीकांत शिंदे यांनी दिलंय मुख्यमंत्र्यांना कर्ज, हिऱ्याची अंगठी ते जमीन वाचा संपत्तीची संपूर्ण माहिती

कारवाईच्या स्थगितीनंतर उलट सुलट चर्चा

अभिजीत पाटील हे करमाळ्यातील मोठं प्रस्थ आहे. त्यांची मोठी ताकद आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. शरद पवारांचे अत्यंत जवळचे म्हणून त्यांची ओळख आहे. अजित पवारांनी बंड केले. त्यानंतरही पाटील हे शरद पवारांबरोबरच होते. माढा लोकसभा मतदार संघातून त्यांनी धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या प्रचाराचीही सुरूवात केली होती. मात्र त्याच वेळी त्यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली. त्यांची तीन गोडाऊन सील करण्यात आली. मात्र फडणवीसांना भेटल्यानंतर ही कारवाई मागे घेण्यात आलीय. आधी कारवाई मग फडणवीस भेट, पाठिंब्याची घोषणा आणि कारवाईला स्थगिती या घटना क्रमाची चर्चा सध्या मतदार संघात जोरात सुरू आहे. शिवाय ही कारवाई नक्की कशासाठी केली गेली होती याचीही चर्चा रंगू लागली आहे.    

Advertisement

माढ्यात काट्याची टक्कर 

माढा लोकसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात काट्याची टक्कर होत आहे. या मतदार संघात सुरूवातीपासूनच अनेक घडामोडी घडल्या. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने मोहिते पाटलांनी पवारांचा हात धरला. पवारांनीही एकामागू एक दणके भाजपला देत आपली बाजू मजबूत केली. उत्तर जानकरांसारखा नेता आपल्याकडे वळवण्यात पवारांना यश आले. शिवाय सांगोल्याचे अनिकेत देशमुख यांची समजूत काढण्यातही त्यांना यश आले होते. रामराजेंना मानणारा एक गटही पवारांच्या मागे ताकदीने उभा आहे. त्यामुळे फडणवीसांचे टेन्शन वाढले होते. मात्र फडणवीसांनीही पवारांना आता एकामागून एक धक्के द्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे या मतदार संघातली लढत रोचक झाली आहे.     
 

Advertisement