कल्याणमध्ये चक्र फिरली, गणपत गायकवाडांचा मोठा निर्णय

उल्हासनगर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर आमदार गायकवाड आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यातला वाद विकोपाला गेला होता. त्यामुळे नाराज भाजप कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध करत वेगळी भूमिका घेतली. परंतु ही नाराजी दूर करण्यात भाजपला अखेरीस यश मिळालं आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
कल्याण-डोंबिवली:

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांची धामधूम जोरात सुरु आहे. कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी काही दिवसांपूर्वी उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. परंतु शिवसेनेतर्फे अद्याप श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली नसल्यामुळे या भागात विरोधक श्रीकांत शिंदेंना घेरण्याच्या प्रयत्नात आहे. याचवेळी कल्याण येथील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी श्रीकांत शिंदे यांना विरोध दर्शवला होता. गायकवाड समर्थकांच्या या भूमिकेमुळे कल्याण-डोंबिवलीत महायुतीमध्ये मिठाचा खडा पडतो की काय असं चित्र निर्माण झालं होतं. परंतु अखेरीस भाजपच्या नेतृत्वाला आमदार गायकवाड यांच्या समर्थकांची नाराजी दूर करण्यात यश मिळालं आहे.

पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, आमदार गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप - 

काही महिन्यांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे जमिनीच्या वादातून आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे समर्थक नेत्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात शिंदे समर्थक नेता थोडक्यात बचावला होता. या गोळीबाराची दृष्य मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात भाजपवर टीकेची झोड उठली होती. चहुबाजूंनी होत असलेली टीका पाहता, भाजपनेही एक पाऊल मागे घेण्याची भूमिका घेतली. पोलीसांनी या प्रकरणात कारवाई करत गणपत गायकवाड यांना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.

Advertisement

परंतु गोळीबार झाल्यानंतर गणपत गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. मतदार संघात निधीपासून ते ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे गुंडगिरीच्या माध्यमातून आपलं वर्चस्व निर्माण करु पाहत असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला. तसेच आपले काही लाख रुपये शिंदेकडे अडकून असल्याचंही गायकवाड म्हणाले होते. पोलीस कारवाईनंतर हे प्रकरण थंडावलं असलं तरीही गायकवाड समर्थकांमध्ये श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात नाराजी होती.

Advertisement

अवश्य वाचा - एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर? शिंदे- महाजन -पाटील यांच्यात चर्चा काय?

गायकवाड समर्थकांची नेतृत्वाकडून समजून, श्रीकांत शिंदेंना भाजपचा पाठींबा -

आगामी लोकसभा निवडणुक ही महायुतीसाठी अत्यंत महत्वाची आहे. केंद्रातील भाजप सरकारने अब की बार चार सौ पार हा नारा दिला आहे. केंद्रीय नेतृत्वानेही महाराष्ट्रात महायुतीच्या नेत्यांवर 40 पेक्षा अधिक खासदार निवडून आणायचं लक्ष्य ठेवलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसवायचं असल्यास राज्यातून अधिकाधिक महायुतीचे खासदार निवडून येणं गरजेचं आहे. कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळाला ही कार्यकर्त्यांची भावना गैर नसली तरीही श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या उमेदवारीचं स्वागत केलं गेलं पाहिजे अशा स्वरुपाचा संदेश भाजपच्या नेतृत्वाने आमदार गायकवाड समर्थकांना दिला आहे. आमदार गायकवाड यांनीही राज्यातील नेतृत्वाने दिलेल्या सल्ल्याचा आदर करत या भावना आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवल्या आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी यांनी दिली.

Advertisement

नरेंद्र सुर्यवंशी यांनी आमदार गायकवाड यांच्या संपर्ककार्यालयात पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला. भाजप कार्यकर्त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. यासाठी त्यांनी बैठक घेऊन घोषणा दिल्या तर ते गुंड ठरत नाहीत. उमेदवाराची घोषणा होईपर्यंत मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी मागणी करणंही गैर नसल्याचं सुर्यवंशी यांनी यादरम्यान सांगितलं. याचदरम्यान सु्र्यवंशी यांनी शिवसेेनेचे स्थानिक नेते दीपेश म्हात्रे यांनी भाजपविरोधी वक्तव्य करणं टाळलं पाहिजे असाही सल्ला दिला.