देवा राखुंडे, प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सूनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी पराभव केला होता. बारामती लोकसभा मतदारसंघातील त्या निवडणुकीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीच्या निमित्तानं अजित पवार आणि त्यांचे पुतणे रोहित पवार आमने-सामने आले होते. आता सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड होताच रोहित यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. पण, त्याचवेळी काका अजित पवार यांना टोला लगावलाय.
काय म्हणाले रोहित पवार ?
रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांचं अभिनंदन करताना अजित पवार यांना टोला लागवण्याची संधी सोडली नाही. 'माझ्या काकी म्हणून त्यांचे अभिनंदन करतो त्या खासदार झाल्या आहेत. अजित पवार मला नौटंकी म्हणतात. त्यांचे 18 आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्या पक्षतील लोकं अस्वस्थ आहेत. त्यांचे सोबत असलेले आमदार ब्रम्हदेव आला तरी कायम राहणार नाहीत. त्यामुळे सुनेत्रा काकींना उमेदवारी दिली, त्यांचे अभिनंदन करतो,' असा दावा रोहित पवारांनी केला.
( नक्की वाचा : राज्यसभेवर सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड, बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष )
मुलगा किंवा बायको सोडून जाणार नाही याची खात्री दादांना असावी म्हणून त्यांना घरात उमेदवारी दिली. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली अजित दादांनी विकास केला. उद्या आपले आमदार आणि नेते जे आपल्याबरोबर आज आहेत.ते दादांबरोबर ते बरोबर राहतीलच असं नाही. पुढच्या सहा वर्षासाठी कुठलं तरी पद आपल्याबरोबर असावं या दृष्टिकोनातून दादांनी कदाचित ते केलं असावं, असा टोला रोहित पवारांनी लगावला.
सुनेत्रा पवारांना तुमच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. आता कालच अॅडव्हान्समध्ये शुभेच्छादिलेल्या आहेत. माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही. बोलणं होईल असं वाट नाही. तुमच्या माध्यमातून फक्त शुभेच्छा आणि भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवतो, असं त्यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : बारामती शरद पवारांचीच! संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी )
'महायुती टिकणार नाही'
पंधरा-वीस दिवसानंतर आपल्याला महायुतीत दिसेल असं वाटत नाही. बजेट करतील निधी हा दिला जाईल आणि त्यानंतर कदाचित तिन्ही पक्ष त्यांचे वेगळे होतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. भाजपा विधानसभेला 200 जागा लढणार आहे. एकनाथ शिंदेंना 30, अजित पवारांना 20 आणि बाकी जागा उर्वरित पक्षांना दिल्या जातील, त्यामुळे महायुती टिकणार नाही, असा दावा रोहित पवारांनी केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
युगेंद्र पवार वि. अजित पवार
बारामतीमध्ये युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केलीय त्याबाबतचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील. जयंत पाटील आणि माझ्यात कोणताही वाद नाही. आम्हाला आमच्या जागा वाढवायच्या आहेत, असं स्पष्टीकरण रोहित पवारांनी दिलं.